अभिनेता वरुण धवन गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘जुडवा २’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळालं. आता अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात असतानाच ‘जुडवा २’चं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टर शेअर केला आहे.

वरुणने शेअर केलेला हा फोटो पाहताना त्यात नावाप्रमाणेच सर्व काही ‘जुडवा’ दिसत आहे. मुख्य म्हणजे हा पोस्टर पाहताना प्रथमदर्शनी लांब केसवाला तो मुलगा टायगर श्रॉफ असल्याचं वाटत आहे. पण, तो वरुण धवनच असून, त्याचा वेगळा लूक यात दाखवण्यात आला आहे. मुख्य म्हणजे त्याचा हा लूक पाहताना अनेकांनाच वरुणच्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण होते. तेव्हा आता त्याचा हा लूक आणि अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. तर डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. १९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘जुडवा’चा सिक्वल आता पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे येत्या काळात ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन हा सलमान खानची भूमिका वठवू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडतोय. कारण, ‘जुडवा’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री रंभा आणि करिष्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. दरम्यान, ‘जुडवा २’ मध्ये सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BX68Euvn6NB/