बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने अनेकांच्या टिकेला उत्तर देत कंगनाने आजवर स्वत:ला सिद्ध केले आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला पाठिंबा दिल्यानंतर आता कंगना भारतीय सेनेला एका व्हिडिओच्या माध्यमातून मानवंदना देत आहे. ‘लव युवर कंट्री’ असे म्हणणाऱ्या या व्हिडिओतून अभिनेत्री कंगनासह बरीच, लहान मुलेही झळकत आहेत.
तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या पार्श्वभागात चालणाऱ्या गाण्याला सिद्धार्थ शर्मा, पियूष वासनिक आणि यश चौहान यांनी गायले आहे. अतिशय सोप्या पण प्रभावीरित्या चित्रीत केलेले हे गाणे सध्या यू ट्युबवर प्रचंड गाजत आहे. बलात्कार, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, बालविवाह यांसारख्या गोष्टींना प्रकाशझोतात आणत हा व्हिडिओ साकारला आहे. दरम्यान, नुकतीच कंगना एका व्हिडिओतून देवीच्या रुपात चाहत्यांसमोर आली होती. तिच्या या व्हिडिओच्या निमित्ताने कंगना रणौतने एका कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेचे महत्त्वही मांडले होते. स्वच्छ भारत आभियानाअंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘डोंट लेट हर गो’ या व्हिडिओमधून ‘जिथे स्वच्छता तिथेच समृद्धीची देवी लक्ष्मी वसते’ या संदेशाचे सुरेख चित्रण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी सगळ्यांनीच सहकार्य केले पाहिजे असे आवाहनही या व्हिडिओद्वारे करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात शोभा डे यांनी केलेल्या बहुचर्चित ट्विटला निराशाजनक म्हणत कंगना चर्चेत आली होती.