राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर ५०० पुस्तिका
आतापर्यंत मध्य रेल्वेच्या पूर्ण कारभारात कुठेही स्थान नसलेल्या मराठी भाषेला मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत स्थान मिळाले आहे. मध्य रेल्वेने आपल्या तक्रार पुस्तिकेत इंग्रजी आणि हिंदी या भाषांसह आता मराठीतूनही तक्रार घेण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील सर्वच मोठय़ा स्थानकांवर ही नवीन तक्रार पुस्तिका उपलब्ध होणार असून अशा ५०० पुस्तिका रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे पाठवण्यात आल्या आहेत. रेल्वेचे स्टेशन अधीक्षक, उप-स्टेशन अधीक्षक, उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचे गार्ड यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तिकांमध्ये आता मराठीतून तक्रार नोंदवता येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी एका अधिकाऱ्याने मराठीतून नोंदवलेल्या तक्रारीला आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर आता मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजीव दत्त शर्मा यांनी तक्रार पुस्तिकांमध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. याआधी मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा समावेश होता. आता मराठीचाही समावेश असलेल्या या तक्रार पुस्तिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अशा ५०० पुस्तिकांचे वाटप पहिल्या टप्प्यात झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.या तक्रार पुस्तिका रेल्वेचे स्टेशन अधीक्षक, उप-स्टेशन अधीक्षक, उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचे गार्ड यांच्याकडे उपलब्ध असतात. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची एक प्रत स्टेशन अधीक्षकाकडे, एक तक्रारदार प्रवाशाकडे आणि तिसरी प्रत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात पाठवली जाते. या पुस्तिकेत तक्रारदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप यांचा समावेश असतो.
लघुसंदेशाचीही सोय
मध्य रेल्वेवर वर्षभरात येणाऱ्या आठशेहून अधिक तक्रारींपैकी सुमारे ३०० तक्रारी पारंपरिक तक्रार पुस्तिकेद्वारे येत असतात. यात तक्रारींची संख्या २२० आणि सूचनांची संख्या ८० एवढी असते. तर ऑनलाइन दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या तब्बल ५०० एवढी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर ‘सीओएमएस’ (कम्प्लेण्ट मॅनेजमेण्ट सिस्टीम) हा कक्ष सुरू झाला असून त्यावरही तक्रारी नोंदवल्या जात आहेत. तसेच मध्य रेल्वेने तक्रारी नोंदवण्यासाठी ९७१७६३०९८२ या क्रमांकावर लघुसंदेश (एसएसएस) पाठवण्याचीही सोय केल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
