भाजपला गुंगारा देत तीन राज्यांतून हार्दिक मुंबईत

गुजरातमधील सरकारी यंत्रणांना चकवा देण्यासाठी तीन राज्यांची वारी करीत ‘मातोश्री’ भेटीकरिता आलेल्या हार्दिक पटेलचे खासगी विमान तब्बल दीड तास मुंबईवर घिरटय़ा घालत होते. हार्दिकचे विमान पुन्हा गुजरातकडे वळविण्यात आल्याच्या शंकेमुळे मुंबई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी गेलेल्या शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला. अखेर सोमवारी रात्री सव्वाअकरा-साडेअकराच्या सुमारास हार्दिकचे पाय मुंबई विमानतळाला टेकले आणि शिवसैनिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिवसेनेच्या या गनिमीकाव्यामुळे भाजपला मात्र ‘हार्दिक’ धक्का बसला .

विधानसभा निवडणुकीत भाजपने युतीबाबत दिलेला धक्का लक्षात घेता शिवसेनेने पालिका निवडणुकीसाठी अत्यंत सावधपणे रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने मुंबईमधील पाटीदार समाजाला आपलेसे करण्यासाठी हार्दिक पटेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. साधारण दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या एका मोठय़ा नेत्याकडे हार्दिक पटेल याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हार्दिक पटेलच्या ‘मातोश्री’ भेटीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र शिवसेनेतील बहुतांश नेत्यांनाही याची कल्पनाही नव्हती.

सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी हार्दिकचा मुंबई दौरा निश्चित करण्यात आला. पण त्याबद्दल मुंबईतीलच नव्हे तर गुजरातमधील सरकारी यंत्रणांना चाहूल लागू द्यायची नाही, असे आधीच निश्चित झाले होते. त्यानुसार समाजाच्या बैठकांचे कारण पुढे करीत हार्दिकने रविवारी सकाळी खासगी विमानाने गुजरात सोडले. तीन राज्यांमधील पाटीदार समाजाच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत रविवारचा दिवस घालविल्यानंतर त्याच्या खासगी विमानाने मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. हार्दिकची उपस्थिती कळू नये म्हणून विमानातील प्रवाशांमध्ये ‘एच. पटेल’ नावाच्या आणखी दोन व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यातून सोमवारी रात्रीच्या सुमारास हार्दिक पटेल मुंबईला रवाना झाल्याची बातमी फुटली. तीन राज्यांचा दौरा आटोपून रात्री हे विमान मुंबईच्या दिशेने उडाल्यामुळे गुजरातमधील सरकारी यंत्रणांचा गोंधळ उडाला. या विमानात हार्दिक पटेलच असल्याची खात्री झाली. तोपर्यंत विमान मुंबईजवळ पोहोचले होते. मात्र तब्बल दीड तास हे विमान आकाशात घिरटय़ा घालत होते. त्यामागचे कारण मात्र प्रवाशांना समजत नव्हते. विमानतळावर विमान उतरविण्यात येत नसल्याने हार्दिक आणि त्याच्या सोबतची मंडळीही अस्वस्थ झाली होती.हार्दिक पटेलचे खासगी विमान मुंबई विमानतळावर पोहोचले नसल्याने त्याच्या स्वागतासाठी गेलेले शिवसैनिक ताटकळत उभे होते. हार्दिकच्या विलंबाचे कारण समजत नसल्याने तेही बुचकळ्यात पडले. हार्दिक मुंबईला रवाना झाल्याची बातमी गुजरातमध्ये वाऱ्यासारखी पसरली व भाजपच्या गोटामध्ये गोंधळ उडाला. तब्बल दीड तासाच्या विलंबान विमान  उतरले.

‘शिव वडापाव’ची मागणी

मुंबईत पोहोचल्यानंतर शिवसैनिकांच्या सुरक्षेमध्ये हार्दीकने हॉटेल गाठले. प्रवासाचा क्षीण दूर झाल्यानंतर रात्रीच त्याने युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली. मात्र या भेटीबद्दलही अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. या भेटीमध्ये मुंबईकरांचा आवडता पदार्थ बनलेल्या वडापावची चव हार्दीकने चाखली. त्यानंतर त्याने मुंबईमधील ढोकळ्याची चवही चाखली.