देशाच्या विकासासाठी दर्जेदार नेतृत्त्वाची गरज असून त्या नेतृत्त्वाकडे दिशा असणे आवश्यक असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. नेतृत्त्वाकडे जिद्द, प्रत्येकापर्यंत पोहचण्याची क्षमता, यशापयशाचे व्यवस्थापन आदी गुण असणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कलाम यांनी ‘नोकरी शोधत बसण्यापेक्षा इतरांना नोकरीची संधी निर्माण करणारे व्हा’, असा सल्लाही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेबद्दल कलाम म्हणाले की, ‘सर्वात प्रथम आपल्याकडील कल्पनांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहीजे. यासाठी देशात खुल्या प्रयोगशाळा उभारल्या गेल्या पाहिजेत. आजच्या परिस्थितीमध्ये देशात जे विद्यार्थी विज्ञान किंवा तंत्रज्ञाना शाखांशी संबंधित आहेत त्याच विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांमध्ये जाऊन प्रयोग करण्याची संधी मिळते. मात्र त्या व्यतिरिक्त ज्यांना कुणाला काही कल्पना सुचतात त्यांना त्यावर काम करण्यासाठी कुठेच संधी मिळत नाही. जर ही संधी उपलब्ध झाली तर आपण या मोहिमेत खूप पुढे जाऊ.’ कलाम यांनी आखलेल्या ‘वर्ल्ड व्हिजन २०३०’ मध्ये सौरउर्जेवर विशेष भर दिला आहे. यात त्यांनी देशात ज्यावेळेस दोन अब्ज घरे सौर उर्जेवर चालतील त्यावेळेस आपण वीजेवर खर्च होणारे काही अब्ज रुपये वाचवू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
वैज्ञानिक संशोधनावर चर्चा
मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू असलेल्या १०२व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध वैज्ञानिक संशोधनांवर चर्चा केली. याचबरोबर येत्या दोन वर्षांत मधुमेहासारख्या आजारावर औषधनिर्मिती करण्यात आपल्याला यश येईल असेही ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी मंगळयानाच्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळण्याचा सल्ला दिला.