मांस विक्रेत्यांना मारहाणीचे अनेक प्रकार घडल्याने सरकारकडून आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीसाठी मांस विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला आज नोटीस बजावली.


सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक शदाब पटेल यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये मांस विक्री करणाऱ्या दुकान मालकांना २४ तास सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मांस विक्रेत्यांना दुकानात शस्त्र बाळगण्याचा परवानाही देण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी या याचिकेत केली आहे.

या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने कथित गोरक्षकाकडून होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात उत्तर देण्याबाबत राज्य सरकारला नोटीस पाठवून विचारणा केली आहे. त्याचबरोबर या याचिकेची सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आली.

गोरक्षणाच्या नावाखाली मांस विक्रेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी नागपूर येथिल सलीम इस्माईल शाह हे आपल्या दुचाकीवरून मांस घेऊन जात आसताना त्यांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर मे महिन्यांत मालेगावमध्ये दोन मांस विक्रेत्यांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती केली होती.

याच पद्धतीचे अनेक गुन्हे राज्यातही नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये वाशी, नालासोपारा आणि अहमदनगर येथेही अशा प्रकारे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.