मोसमी पावसाचा अंदाज चुकल्याने हवामान खाते भरपाई देणार का?, शेतकऱ्यांकडून विचारणा

मोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्याची हवामान खात्याची घाई आणि वारंवार बदलत जाणारे अंदाज शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरले असून विदर्भ, खान्देश, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून फार मोठी चूक केल्याची शेतकऱ्यांची भावना असून, या नुकसानीची भरपाई हवामान खाते देणार का, अशी विचारणा आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हवामान खात्याने अंदमानच्या भरवशावर मोसमी पाऊस लवकर येणार असल्याचे आणि पाऊस भरपूर पडणार असल्याचे जाहीर केल्याने राज्यातला शेतकरी सुखावला. मात्र, कोकणात प्रवेश केलेल्या मोसमी पावसाने तेथेच ठाण मांडले आणि हवामान खाते तोंडघशी पडले. त्यातून सावरण्याऐवजी  पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरींना त्यांनी मोसमी पावसाशी जोडत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज जाहीर करण्याची घाई केली. पूर्वमोसमी पावसामुळे मराठवाडय़ातील जमिनीत ओलावा असल्याने त्यांनी पेरण्या सुरू केल्या, पण विदर्भात पश्चिम विदर्भ वगळता इतर ठिकाणी जमिनीत ओलावा नाही. तरीही, केवळ हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावर त्यांनी पेरणी सुरू केली. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने हे सर्व शेतकरी तोंडघशी पडले आहेत.

मराठवाडय़ात दुबार पेरणीची फारशी भीती नसली तरीही उशिरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे आज, उद्या पाऊस बरसला नाही तर २०० ते ३०० कोटींचे नुकसान होणार आहे. खान्देशातही तेवढेच नुकसान असून सर्वाधिक फटका मात्र विदर्भाला बसला आहे. एकटय़ा विदर्भात ५०० ते १००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विदर्भात सुमारे २५ ते ४० टक्के एकरात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे अशा ४० टक्क्यांपैकी १० ते २० टक्के म्हणजेच सरासरी ४ ते ८ टक्के शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळू शकेल. येत्या २७ जूनपर्यंत पाऊस आला नाही तर सुमारे ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे कृषी अभ्यासकांचे म्हणणे आहे. कापसाची लागवड जितक्या लवकर आणि व्यवस्थित केली, तेवढे उत्पादन चांगले होते. कापसाच्या  लागवडीकरिता अंदाजे ७५ मि.मी. पावसाची गरज असते. त्यापेक्षा कमी पावसात पेरणी सुरू केली तर नुकसानीची शक्यता अधिक असते. शेतकरी या अंदाजाच्या जवळपास पाऊस पडला तरीही पेरणी सुरू करतात.

१राज्यात सुमारे १ कोटी ५० लाख बियाण्यांच्या पिशव्यांचे विपणन  होते. त्यातील ५० टक्के म्हणजेच ७५ लाख बियाण्यांच्या पिशव्यांचे विपणन एकटय़ा विदर्भात होते.  १५ ते २० लाख पिशव्या बियाण्यांची दुबार पेरणीसाठी गरज आहे. ज्या २० लाख पिशव्यांमधील बियाण्यांची पेरणी झाली आहे, त्याची किंमत अंदाजे १६० कोटी रुपये आहे. त्याच्या पेरणीमागे लागणारी मजुरी ६० कोटी रुपयांची आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी दोनशे कोटी रुपयांचे खत टाकले आहे.

२हवामान खात्याच्या कृषी सल्ला विभागाला अंदाज देता येत नसतील तर शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी आणि कधी करू नये याचा सल्ला देऊ नये. त्यांनी पावसाच्या अंदाजाऐवजी पाऊस कुठे पडला आणि किती पडला एवढेच सांगण्याचे काम करावे. हवामान खाते शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. शेतकऱ्यांवर येणारे हे दुबार पेरणीचे संकट आणि त्याची भरपाई हवामान खाते करणार का, असा प्रश्न ज्येष्ठ कृषी अभ्यासक गजानन जाधव यांनी केला.

३हवामान खात्याच्या मोसमी पावसाबाबतच्या अंदाजाचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्यत बसला असून त्यापाठोपाठ अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यतही नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे १ लाख २३ हजार ५५२.६९ एकरमध्ये पेरणी झालेली होती आणि प्रति एकर ३५०० रुपयांचे नुकसान आता शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. पूर्वमोसमी पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि मोसमी पावसाने पाठ फिरवली. तापमान वाढले आणि जमीन पुन्हा कोरडी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ५५ ते १०० मि.मी. पाऊस पडूनही काहीच उपयोग झाला नाही.