सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रामध्ये केंद्र सरकारने देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तब्बल १० हजार ७२२ नवीन जागा निर्माण केल्या. या तुलनेत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६ हजार ७६० नवीन जागा निर्माण करण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनाच असल्याचे शपथपत्र भारतीय वैद्यकीय परिषदेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये हे खासगी महाविद्यालयांवर भारी ठरत असल्याचे स्पष्ट होते.
२०१३ ला महाराष्ट्र सरकारने बारामती, चंद्रपूर आणि गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया येथील महाविद्यालयांचे काम रखडले. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इटनकर आणि रामदास वागदरकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली.