पालकमंत्र्यांचा मतदारसंघ; निकृष्ट बांधकामाचा नमुना

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मानेवाडा-बेसा मार्गावरील गेल्या आठवडय़ात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन पुलाचा काही भाग आजच्या पावसात वाहून गेला. पुलाचे बांधकाम सार्वजानिक बांधकाम विभागाने केले होते. दरम्यान, कंत्राटदाराची कामात कुठलीही चूक नसल्याचे सांगत सार्वजानिक विभागातील अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.

पावसाचा फटका पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील हुडकेश्वर, नरसाळा भागाला चांगलाच बसला. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या बेसा मार्गावरील कच्चा पूल तोडून तेथे ४० फुटाचा नवीन पूल अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. आठ दिवसापूर्वी तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. आजच्या पावसात पूल वाहून गेला. परिसरातील लोकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याला माहिती दिली आणि तो मार्ग बंद करण्यात आला. आनंद गुदराज या कंत्राटदाराकडे या पुलाचे बांधकाम असून त्यावर ५ कोटी खर्च झाल्याची माहिती आहे. मार्च महिन्यात या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. पुल वाहून गेल्याचे कळताच सार्वजानिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार तेथे पोहोचले आणि त्यांनी तात्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. कंत्राटदार हा पालकमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याची चर्चा आहे.

पुलाच्या शेजारी मोठा नाला असून त्यावर लोकांनी अतिक्रमण केले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी पुलाच्या भागात जमा झाले आणि त्यात पुलाचा एक भाग वाहून गेला. मुख्य पुलाला कुठलाही धक्का लागला नाही. वाहून गेलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदाराने केलेले काम तपासून बघितले जाईल.  चंद्रशेखर गिरी, उपअभियंता, सार्वजानिक बांधकाम विभाग