राज्यात बलात्काराच्या ४ हजार १४४ घटनांची नोंद; ४ हजार ११५ प्रकरणांत आरोपी परिचयाचे

माणसाला समाजाची पहिली ओळख ही त्याच्या कुटुंबीयांपासून होते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि मूलभूत पाया रचला जातो तो कुटुंबीयांच्या संस्कारांमधून. घरातील सदस्य, नातेसंबंधातील व्यक्ती, परिचित व्यक्तींकडून आपण प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेची अपेक्षा करण्यात येते, परंतु आपल्याच लोकांकडून अत्याचाराच्या घटना घडत असतील तर समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून गेल्या काही दिवसातील घटना बघता समाजासाठी चिंतेची बाब आहे.

नाते संबंधातील व्यक्ती, ओळखीतील पुरुष यांच्याकडून लहान मुले, मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात उघडकीस येत आहेत. राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोच्या २०१५ च्या अहवालानुसार राज्यात बलात्काराच्या ४ हजार १४४ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ४ हजार ११५ प्रकरणात आरोपी हे परिचयाचे, नात्यातील आहेत. त्यात आजोबा, वडील, भाऊ, मुलगा अशा नात्यातील आरोपींची संख्या ६९ आहे, तर जवळच्या नात्यातील ७० आरोपींचा समावेश आहे. एकूण अत्याचारांच्या घटनांमध्ये नातेसंबंध आणि परिचयातील लोकांकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण तब्बल ९९.३ टक्के आहे. राज्यभरात लहान मुलांविरुद्ध विविध कलमांखाली १३ हजार ९२१ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यात २०७ खून, २ हजार २३१ बलात्काराच्या घटनांचा समावेश आहे. तर विनयभंगाच्या घटनांची संख्या २ हजार ४६८, लैगिंग शोषणाच्या १ हजार ४३ आणि अपहरणाच्या घटना ६ हजार ९६० आहेत.

कित्येकदा लहान मुलाचे किंवा किशोर वयातील मुलामुलींचे आईवडील परिचयातील आणि ओळखीच्या व्यक्तींवर नको तेवढा विश्वास टाकतात आणि मुलामुलींना त्यांच्या भरवशावर सोडून देतात. त्यानंतर तीच व्यक्ती संबंधित मुलामुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस येते. याशिवाय घरातील मुलींना आपल्याच घरात, नात्यांतल्या लोकांकडून नकोशी अंगलगट, नकोशे स्पर्श, नजरा, द्विअर्थी बोलणे इत्यादी सहन करावे लागते. पर्यायी त्यांच्या लैंगिक चाळ्यांचा सामना करावा लागतो.

सज्ञान मुली, स्त्रियांनाही आपल्या नातेवाईकांकडून अशा तऱ्हेचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा त्याचा संबंध थेट त्या मुलीच्या दिसण्या- वागण्या- राहण्याशी आणि तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. अहोरात्र त्या व्यक्तीचा सहवास कितीही नकोसा असला तरी सहन करण्यावाचून अन्य पर्याय स्त्रियांकडे उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी महिलांनी आणि मुलांनी आपल्यावरील अन्याय, अत्याचाराला किंवा त्यांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडून देण्याचा प्रयत्न करावा. घरात तसे वातावरणाची निर्मिती करावी. आपले मन घरातील सदस्यांकडे मोकळे करावे, असा सल्ला देण्यात येतो. मात्र, या परिस्थितीतून जाणारी महिलाच तिचे दु:ख समजू शकेल. बहुतांश घरात अशाप्रकारचे प्रसंग उभे ठाकत असून नागपुरात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनांतून हे उघड होते.

लग्न लावून देणाऱ्या वकील मानसभावानेच अश्लील संदेश पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना राणाप्रतानगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली, तर जरीपटका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने बाहेरगावी जाताना शेजारच्या मित्राला आपल्या मुलीची काळजी घेण्यास सांगितले होते. त्यानेच विश्वासघात करून अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला, तर २ सप्टेंबरला एका ५८ वर्षीय वडिलाने स्वत:च्या अंध मुलीवर बलात्कार केल्याची घटना सक्करदरा पोलीस ठाण्यात उघडकीस आली. या सर्व घटना मनुष्याला आत्मचिंतन करण्यासाठी भाग पाडणाऱ्या असून आपण मुलामुलींना आणि स्त्रियांना सुरक्षित वातावरण देऊ शकतो, याचा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे.

नातेसंबंधातील प्रकरणांत पुराव्यांचा अभाव

अशाप्रकारची प्रकरणे सोडविण्यासाठी तिऱ्हाईतांची मदत न घेण्याकडे आणि प्रकरण परस्पर मिटविण्याचा अनेकदा प्रयत्न होतो. वैयक्तिक आणि कुटुंबाची बदनामीची भीती लोकांना वाटते. घटनांचे लिखित, मुद्रित पुरावे नसतात. घटनांना साक्षीदार नसल्याने आरोप सिद्ध होत नाही आणि त्याचा फायदा आरोपींना होतो. काही ठिकाणी आर्थिक संबंध गुंतलेले असतात. शिवाय मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे, तिची बदनामी करणे, हेटाळणी करण्यात येत असल्याने पीडित महिला, मुली समोर येत नाहीत, हे समाजाचे वास्तव आहे.

ॅड. रवि केशव बोकडे