स्वतंत्र रुग्णालयाची घोषणा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांचे वास्तव वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडले. या रुग्णालयांत उपकरणे असली तरी ती हाताळणारे कुशल कर्मचारी नाहीत, उपकरणांची देखभाल व दुरुस्ती होत नाही. राजकारण्यांच्या तुलनेत जास्त राजकारण डॉक्टर करतात. मात्र, त्याचा फटका रुग्णांना बसत आहे, अशा  शब्दात गडकरींनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे वाभाडेच काढले. उत्तर नागपुरात लवकरच सिकलसेल, थॅलेसेमियाग्रस्तांकरिता स्वतंत्र रुग्णालयाची घोषणाही त्यांनी केली.

राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि टाटा मेमोरियल ट्रस्टच्यावतीने ‘मेडिकल’मध्ये देशातील पहिल्या स्टेम सेल्स बोन मॅरो रजिस्ट्री केंद्राचे शनिवारी गडकरींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी गिरीश महाजन यांना उद्देशून गडकरी म्हणाले, तुमच्या विभागातील शासकीय रुग्णालयांत (वैद्यकीय शिक्षण विभाग) नवनवीन सोयी आणल्या जातात. मात्र, कोटय़वधींची मशिन्स वेळेवर येत नाहीत. उपकरणे आली तर हाताळणारे कर्मचारी मिळत नाहीत. उपकरणांची देखभाल व दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, अशी अवस्था आहे. गडकरी हे महाजनांच्यासमोर वैद्यकीय शिक्षण विभागाचे वाभाडे काढत असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

चांगली कामे करणाऱ्या डॉक्टरांना छळणे मंत्रालयाने बंद केले तर रुग्ण हिताशी निगडीत प्रकल्प मार्गी लावले जाऊ शकतात. मेयोत अशाच पद्धतीने सिकलसेल केंद्रात चांगले काम होत होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. श्रीखंडे यांची बदली केल्यामुळे हे केंद्रच बंद पडले. त्यामुळे मध्य भारतातील सिकलसेलग्रस्तांना फटका बसला. हा प्रकार भविष्यात टाळण्याकरिता चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांची बदली करून डॉक्टरांकडून होणारे राजकारण संपवण्याची गरज आहे. उत्तर नागपुरातच सिकलसेल, थॅलेसेमिया या वेदनादायी आजारांचे गरीब गटातील ४० हजार रुग्ण आहेत. पूर्व विदर्भात त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे येथे संशोधनावर आधारित स्वतंत्र रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी मी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहे. उत्तर नागपुरात साडेचार एकर जागा या संस्थेला देण्याचा विचार असून ती मिळताच  सिकलसेल आणि थॅलेसेमियाग्रस्तांकरिता स्वतंत्र रुग्णालय सुरू केले जाईल, असे गडकरी म्हणाले.

गिरीश महाजन म्हणाले की, स्टेम सेल बोन मॅरो रजिस्ट्रीमुळे रक्ताशी निगडीत दुर्धर व्याधींशी झुंजणाऱ्यांना उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रक्तगटाप्रमाणे राज्यात मोठी स्टेम सेल बॅंक तयार होईल. टाटा ट्रस्टचे तारापोरवाला म्हणाले की, देशात १५ ठिकाणी लवकरच ही नोंदणी सुरू करणार असून नागपूर पाठोपाठ राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिकलाही नोंदणी सुरू होईल. याप्रसंगी प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय सचिव संजय देशमुख, टाटा ट्रस्टचे बुर्जीस तारपोरवाला, महापौर नंदा जिचकार, आमदार नागो गाणार, गिरीश व्यास, डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. अनुराधा श्रीखंडे, डॉ. सिंधू गणवीर आदी उपस्थित होते.

जिवंतपणी स्टेम सेल्स दान करणाऱ्यांचा गौरव

जिवंतपणी स्टेम सेल्सचे दान करून इतरांना जीवदान देणाऱ्या आरती कोलते, प्रतिमा जाधव, ज्योत्स्ना अंजनकर, जुईली माने, नीती अग्रवाल, शंकर वैद्य या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मेडिकलच्या स्टुडंट्स को ऑपरेटिव्ह स्टोअर्सच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश गिरीश महाजन यांना सुपूर्द करण्यात आला.