महापालिकेतच्या शांतीनगर येथील उर्दू शाळेच्या इमारतीत शांतीनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा परिसरात पोलीस ठाणे निर्मितीला विरोध होत असताना महापालिका आता कोणता निर्णय घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून शांतीनगर पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. शांतीनगर पोलीस ठाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष महापौर प्रवीण दटके यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या शांतीनगर येथील उर्दू शाळेतील अर्धी जागा पोलीस ठाण्याच्या निर्मितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळेत ५० ते ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेच्या इमारतीमध्ये पोलीस ठाणे सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर पोलीस ताबा घेतील. चोरी, दरोडा, तस्करी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वापरलेली वाहने शाळेच्या मैदानात साठविण्यात येतील आणि खेळाच्या मैदानावर ताबा येईल. पोलीस आणि गुन्हेगारांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.  या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्या खेळण्यावर र्निबध येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने शिक्षकांच्या विरोधाला झुगारून पोलीस ठाणे निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली. हळूहळू परिसरातील नागरिकही शाळेच्या आवारात पोलीस ठाण्याच्या निर्मितीविरुद्ध आवाज उठवत आहेत. परंतु शाळा परिसरात पोलीस ठाण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव आता स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत ठेवायची गरज आहे.

अद्यापही हा प्रस्ताव ठेवण्यात न आला नाही. त्यामुळे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला.यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महापौर प्रवीण दटके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गुन्हेगारीचे प्रमाण बघता शांतीनगर परिसरात एका पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. आता पोलीस ठाणे कुठे निर्माण करायचे हा पोलीस विभागाचा आणि शासनाचा प्रश्न आहे. शाळा परिसरातील पोलीस ठाणे निर्मितीसंदर्भात महापालिका योग्य तो निर्णय घेईल, असे मत नगरसेवक  रवींद्र डोळस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.