पत्नीपीडित मनोरुग्णाचे कृत्य

सरकारने देशातील महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी अनेक अधिकार प्रदान केले असून त्या आता पुरुषांवर अन्याय करीत आहेत. महिलांच्या प्रत्येक आरोपांवर पोलीस डोळे झाकून कारवाई करतात, त्यामुळे पोलिसांना यातून जागे करण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात स्फोट घडवून आणत असल्याचे पत्र सोडून एका पत्नीपीडित मनोरुग्णाने शुक्रवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात ‘प्रेशर बॉम्ब’चा स्फोट घडविला. शहरात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असताना घडलेल्या या स्फोटामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मुकेश गोरीलाल आंबोरे रा. एच.बी. टाऊन, जुना पारडी नाका असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील मध्यप्रदेशातील सागर येथे दारूपासून दगड फोडण्यासाठी स्फोटके तयार करीत होते. त्यांच्याकडे त्याचा परवाना होता. त्यामुळे मुकेशला स्फोटके तयार करण्याचा अनुभव आहे. कालांतराने तो कामाच्या शोधात नागपुरात आला आणि येथेच राहू लागला. नागपुरात तो सायकलच्या दुकानात काम करायचा. त्याला शीला नावाची पत्नी आणि मनीष व विशाल नावाची दोन मुले आहेत. त्याच्या स्वभावाला कंटाळून चौदा वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली, तर दोन मुले उमरेड तालुक्यातील बेला येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो एकटाच राहतो. दिवसभर फिरत असतो. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध अनेक आरोप लावले आणि जवळपास ५ ते ६ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.

दिवाळीच्या सणानिमित्त घरी आणलेल्या फटाक्यांपैकी काही फटाके शिल्लक होते. त्यातील बारूद काढली. शनिवारच्या चोर बाजारातून एक लोखंडी पाईप घेतला व त्यात ती भरली. पाईपमध्ये एक वात दिली आणि दोन्ही बाजूने बंद करून प्रेशर बॉम्ब तयार केला.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याने मिठा नीम दर्गा परिसरात एक पेटती अगरबत्ती घेतली आणि थेट सदर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोहोचला. तेथील परिसरात नागरिकांना बसण्यासाठी काही बाके आहेत व छोटेसे लॉन तयार केले आहे.

मुकेश हा लॉनवर बसला आणि त्या ठिकाणी प्रेशर बॉम्ब ठेवला व अगरबत्तीने बॉम्बची वात पेटवली व निघून गेला. त्यानंतर २.१६ वाजता बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटामुळे परिसरात बसलेला एक वृद्ध किरकोळ जखमी झाला.

पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी बाहेर पडले आणि जागा शोधली असता स्फोट झाल्याचे दिसले. त्या ठिकाणी दोन पत्रके सापडली. राज्यघटनेत महिला व पुरुषांना समान अधिकार असून महिला समान अधिकारांचा गैरवापर करीत आहे आणि पुरुषांवर अत्याचार करतात, असे त्याचे म्हणणे आहे.

याशिवाय सर्व कायदे महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी असून पुरुषांना बचावाची संधी नाही. पोलीस डोळेझाक करून महिलांच्या तक्रारींवर कारवाई करतात.

त्यामुळे पोलीस झोपले असून त्यांना जागे करण्यासाठी स्फोट घडविण्याची वेळ आपल्यावर आली आहे, असे पत्रांमध्ये नमूद आहे.

बॉम्बनाशक पथक, श्वानपथकही पोहोचले

या घटनेनंतर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, गुन्हे शाखा उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ-२ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील आणि इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बॉम्बनाशक पथक व श्वानपथकांना बोलविण्यात आले. सर्व रसायने आणि साहित्य जप्त करून त्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. सर्वत्र तपासाची चक्रे फिरली गेली.