शहरात २,२०० ज्येष्ठ नागरिक एकाकी

शशीकला नाशिकराव ठाकरे (६५) या वृद्धेच्या खुनानंतर पुन्हा एकदा शहरातील वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून शहरात एकाकी राहत असलेल्या वृद्धांना सुरक्षा पुरविण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. नागपुरात २ हजार २०० एकाकी वृद्धांनी पोलिसांकडे नोंदणी केली असून त्यांना सर्वतोपरी सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचा दावा पोलीस करीत आहेत.

वर्षभरापूर्वी तात्या टोपेनगर येथील वसुंधरा बाळ या वृद्धेचा खून करण्यात आला होता. अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यानंतर अनेकदा वृद्ध महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी पळविण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. वृद्धांकडून प्रतिकार होत असून त्यांची लूट करणे अधिक सोपे असल्याने गावगुंडाचीही हिंमत खूप बढावली आहे. आता वृद्ध लोकांची घरे हेरून घरात घुसून लुटमार करणे, चोरी करण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन नागपूर शहर पोलिसांनी २००५ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुरक्षा विभाग सुरू केला. या विभागाची जबाबदारी सध्या पोलीस उपनिरीक्षक राममूर्ती तिवारी यांच्याकडे आहे. सन २००५ पासून पोलिसांनी ४ हजार ७७५ ज्येष्ठ नागरिकांची नोंद केली आहे. त्यापैकी २ हजार २०० वृद्धांची मुले विदेशात आणि बाहेरगावी राहतात. त्यांची सर्वाधिक संख्या अंबाझरी, धंतोली, सीताबर्डी, सदर, राणाप्रतानगर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आहे. एकटे राहणारे वृद्ध अनेकदा गुंडांचे लक्ष्य ठरतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वृद्धांच्या सुरक्षेसाठी विशेष अधिकारी

वृद्धांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरीक्षक नेमण्यात आले असून त्यांना नोंदणीकृत वद्धांची यादी दिली जाते. या यादीतील वृद्ध प्रत्येक बीट अंमलदारांमध्ये वाटून देण्यात येतात. त्यानंतर बीट अंमलदार ठराविक अंतराने संबंधित वृद्धांची भेट घेऊन त्यांची सुरक्षा आणि इतर गरजांविषयी जाणून घेतो. याशिवाय चालता-बोलता येऊ शकणाऱ्यांना रुग्णालयात ने-आण करण्यापासून पोलीस मदत करतात. त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे नोंदणी करून कार्ड प्राप्त करावे, जेणेकरून पोलिसांना सेवा देण्यात सुविधा होईल.

– नीलेश राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे).

 

राज्यभरात वृद्धांविरुद्ध घडलेले गुन्हे (२०१५)

खून                                  १७३
बलात्कार                         ०९
दरोडा                               २७
चोरी                                ७२०
मारहाण                          ३७१
खंडणी मागणे                 ०४
फसवणूक                       ५९