विक्रमी वृक्ष लागवडीबद्दल सन्मान

राज्यात एका दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मेणाचा पुतळा लोणावळयातील ‘सुनील्स सेलिब्रिटी व्ॉक्स म्युझियम’मध्ये बसवला जाणार आहे. यानिमित्ताने वनमंत्री मुनगंटीवार यांचा सन्मान केला जाणार आहे.

१ जुलैला एकाच दिवशी दोन कोटी ८३ लाख ३८ हजार ६३४ रोपांची विक्रमी लागवड केल्याबद्दल मुनगंटीवार यांचे अभिनंदन करून त्यांचा पुतळा लोणावळा येथील ‘सुनील्स सेलिब्रिटी व्ॉक्स म्युझियम’मध्ये उभारण्याचा निर्णय सुनील कंडूल्लर यांनी घेतला आहे. हे संग्रहालय देशातील एकमेव मेणाचे पुतळे असलेले संग्रहालय आहे. या ठिकाणी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मेणाचे पुतळे बसवले आहेत. अल्पावधीत संग्रहालय पर्यटकांच्या पसंतीच्या ठिकाणांपैकी एक बनले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यांचा मेणाचा पुतळा बनविण्यासाठी परवानगी दिली होती. त्यांचाही पुतळा या संग्रहालयात बसवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही मेणाचा पुतळा याठिकाणी आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांचाही पुतळा याठिकाणी बसवण्यात येणार असून पुतळा तयार करण्याकरिता किमान एक तासांचा वेळ मुनगंटीवार यांना द्यावा लागणार आहे. एकूणच शरीराचे माप आणि छायाचित्र याचीही आवश्यकता पुतळा तयार करताना भासणार आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी मुनगंटीवार यांना पाठवले आहे.