भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या हैदराबाद हाऊसमध्ये एका महिलेने गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. शेवटी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून सीताबर्डी पोलिसांना बोलावून घेतले.

भंडारा येथील रहिवासी वनिता रामटेके, असे गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. चंद्रपूर येथील भाजपच्या कार्यकर्त्यां वनिता कानडे यांच्यावर तिने आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप केले आहे. यासंदर्भात तिने सिव्हिल लाईन्स येथील हैदराबाद हाऊस, या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे कानडे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. दोन्ही महिलांमधील व्यवहार २०१४ मधील असल्याने मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शहानिशा करण्यासाठी दोन्ही महिलांना हैदराबाद हाऊसमध्ये चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी वनिता कानडे यांच्याऐवजी त्यांचे पती हजर झाले. रामटेके यांनी त्यांना पैशांची मागणी केली असता कानडे यांनी लगेचच पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे ती महिला संतापली व तिने आरडाओरड सुरू केली. हे पाहून कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुपारी २ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना या महिलेची तक्रार ऐकून योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. त्यानुसार पोलीस महिलेला घेऊन गेले.

यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातील नचिकेत पिंपळापुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील घटनाक्रमाला दुजोरा दिला. दरम्यान, यासंदर्भात वनिता कानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. कानडे या भाजपच्या कार्यकर्त्यां आहेत हे येथे उल्लेखनीय.