आदिवासी समाजाचे नेते मधुकर पिचड यांची बदनामी केल्याबद्दल शिवसेना नेते अनंत तरे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा आणि बनावट आदिवासींची घुसखोरी थांबविण्यासाठी नाशिक येथे समितीची स्थापना करावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात पारंपरिक वेशभूषेत नृत्य पथकाला घेऊन आदिवासी बांधव सहभागी झाले. यामुळे मध्यवर्ती रस्त्यांवरील वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.

आपल्या मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. सेनेचे उपनेते तरे यांनी पिचडांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यावरून तरेंविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी व मानहानी केल्याचे गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचा मुद्दा मोर्चेकऱ्यांनी मांडला. बनावट आदिवासींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधितांची घुसखोरी थांबविण्यासाठी आदिवासी विकास विभाग कार्यालयात समिती नेमण्याची गरज आहे. बनावट आदिवासींनी औरंगाबाद येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्याला संरक्षण देऊन शाई फेक णाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भोकर तालुक्यात आदिवासी विवाहितेवर अत्याचार करून तिला क्रूरपणे मारण्यात आले. तिच्या पतीलाही मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातील नराधमाला तात्काळ फाशी द्यावी, आदिवासी समाजाचे माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. मोर्चात आदिवासी नृत्य पथकही सहभागी असल्याने मध्यवर्ती भागातील वाहतुकीला अडथळे आले.