केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

धुळे-नाशिक या महामार्गाच्या सहापदरीकरणास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या टप्प्याचे सहापदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यानिमित्ताने यश मिळाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. त्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले असून वर्षभरात प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे. सध्या धुळे-नाशिक प्रवासाला अडीच तासांचा कालावधी लागतो. महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यानंतर हा कालावधी आणखी कमी होणार आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या धुळे ते नाशिक या टप्प्याचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण होऊनही अपघातांचे प्रमाण कमी झाले नव्हते. त्यामुळे या टप्प्याचे सहापदरीकरण व्हावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच डॉ. भामरे यांच्याकडे आला होता. त्याची दखल घेऊन या प्रश्नावर त्यांनी गडकरी यांची भेट घेतली होती. त्या वेळीच या टप्प्याचे विस्तारीकरण केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन मिळाले होते. या प्रस्तावाला केंद्र शासनाने चतुष्कोण योजनेतून मंजुरी दिल्याने सहापदरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यास मुख्य कार्यालयाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल. तांत्रिक प्रक्रियेसाठी साधारणत: एक वर्षांचा कालावधी अपेक्षित असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सहापदरीकरणाचे काम तीन टप्प्यांत होणार असल्याची माहिती भामरे यांनी दिली. या मार्गात येण्या-जाण्यासाठी तीन पदरी रस्ते तसेच दोन्ही बाजूला सेवा रस्ते आणि दर २० किलोमीटर अंतरावर वाहनतळ व प्रसाधनगृहाची व्यवस्था आणि बहुउद्देशीय सेवा संकुल तयार करण्याचे नियोजन आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.