रुंदीकरणानंतरच प्राधिकरणाची मंजुरी मिळणार

नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सर्व सिडको नोडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सिडकोच्या संकल्पाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खो घातला आहे. कळंबोली ते उरण फाटा टी जंक्शन आणि आम्रमार्गावर सिडकोला १२५ सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे, मात्र या मार्गाचा विस्तार करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे कॅमेरे लावण्यास परवानगी नाकारली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात सर्वप्रथम नवी मुंबई महापालिकेने शहरातील मोक्यांच्या जागांवर २६८ सीसीटीव्ही कॅमरे लावले. पालिकेच्या या सीसीटीव्ही प्रकल्पाला अनुसरून सिडकोनेही दोन वर्षांपूर्वी दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात २९४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. खारघर नोडमध्ये १२८ सीसीटीव्ही लावण्यात आले. त्यानंतर कळंबोली, कामोठेतही कॅमरे लावले. सिडको या संपूर्ण प्रकल्पावर ११० कोटी रुपये खर्च करणार आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या सिडको नोडबरोबरच राष्ट्रीय महामार्गात मोडणाऱ्या कळंबोली सर्कल ते पनवेल उरण टी जंक्शन आणि बेलापूर खिंडीतील उड्डाणपूल ते उलवा गावापर्यंतच्या आम्रमार्गावर १२६ सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या मार्गावर कंटनेर वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर कंटेनर चोरांची संख्या वाढली आहे. अपघातांतही वाढ झाली आहे.

पोलिसांच्या सूचनेवरून येथे कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तूर्त नकार दिला आहे. मार्गाची रुंदी ११ मीटरने वाढविली जाणार आहे. त्यामुळे रुंदीकरणानंतर सीसीटीव्हींचा विचार करण्यात यावा, असे कळविण्यात आले आहे.

सिडको दक्षिण नवी मुंबईत सहाशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे. त्यातील काही कॅमरे कळंबोली ते उरण रस्ता आणि आम्रमार्ग या दोन राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात येणार होते पण त्याला परवानगी मिळत नाही. या प्राधिकरणांकडून परवानगी मिळविणे कठीण झाले आहे.

विजय सोमाकुमार, मुख्य महाव्यवस्थापक परिवहन, सिडको