ठरलेल्या वेळापेक्षा कमी काळ भारनियमन; पावसामुळे गारवा

ऑक्टोबर हीटच्या झळा बसत असतानाच तीन तास भारनियमन लागू झाल्यामुळे त्रासलेल्या नवी मुंबईकरांना शुक्रवारी अनपेक्षित दिलासा मिळाला. शुक्रवारी तीनऐवजी दीड तासच वीज खंडित करण्यात आली. अतिरिक्त वीज उपलब्ध झाल्यामुळे भारनियमनाचा कालावधी कमी करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. सायंकाळी शहरात पाऊस सुरू झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

नवी मुंबईचा बहुतांश भाग हा महावितरणने निश्चित केलेल्या अ तसेच ब वर्गात मोडतो. काही भाग क व ड वर्गात आहे. अ आणि ब वर्गातील परिसरात सकाळी ६ ते ७.३० आणि दुपारी १ ते २.३० दरम्यान म्हणजे तीन तास भारनियमन होणार असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले होते, मात्र शुक्रवारी केवळ सकाळी वीज खंडित करण्यात आली. दुपारी मात्र वीजपुरवठा सुरू राहिला.

मंत्री, अधिकाऱ्यांविरुद्ध संताप

बोनकोडे गावातील विमल पाटील यांचा कृत्रिम श्वासोच्छ्वास भारनियमनामुळे अचानक बंद होऊन मृत्यू झाला. त्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. तर  भारनियमनातून नवी मुंबईला मुक्त न केल्यास वीजवितरण विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.