ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘सय-माझा कलाप्रवास’ आणि डॉ. रूपा रेगे-नित्सुरे यांच्या ‘वित्तार्थ’ या ‘लोकसत्ता’तील सदरलेखनावर आधारित पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सई परांजपे यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार तर, रेगे यांना सुभाष हरी गोखले पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १११ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कन्नड लेखिका वैदेही यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे (स्त्री-लिखित मराठी कविता), वा. ल. मंजूळ (श्रीक्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास-फड आणि िदडय़ांसह), अरुण शेवते (माझे गाव माझे जगणे), डॉ. नीलिमा गुंडी (देठ जगण्याचा), डॉ. विजय खरे (संरक्षणतज्ज्ञ, अंतर्गत सुरक्षातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर), प्रभाकर पुजारी (प्राचीन भारतीय राष्ट्रधर्म) अच्युत गोडबोले-नीलांबरी जोशी (मनकल्लोळ भाग १ व २), डॉ. सुधाकर देशमुख (प्रतिभा आणि सर्जनशीलता), सुजाता महाजन (स्वत:तल्या परस्त्रीच्या शोधात), संगीता पुराणिक (गंमत गोष्टी आधुनिक बोधकथा), संजय ऐलवाड (मुलाफुलांची गाणी), विवेक वेलणकर (ग्राहकराजा, सजग हो), डॉ. दिलीप पवार (कामगार कवितेतील सामाजिक जाणिवा), राहुल निकम (बिजवाई), अनिल फडणवीस (गोष्टीरुप हरिपाठ), डॉ. सच्चिदानंद शेवडे (सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स), रश्मी कशेळकर (भुईिरगण), अंजली जोशी (विरंगी मी! विमुक्त मी!), डॉ. चं. वि. जोशी (ग्रेस-अंबरफुलांचे दिवे), वा. ना. अभ्यंकर (शिक्षण विवेक), प्रशांत नाईकवडी (तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती), रेश्मा कुलकर्णी (मी झारा गहरमानी : एक देशद्रोही) यांच्यासह राजहंस प्रकाशनला वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सुनील चिंचोलकर, डॉ. सुलभा ठकार, सायमन मार्टिन, म. भा. चव्हाण, डॉ. पी. व्ही. जोशी, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. दिलीप येळे, प्रमोदिनी वडके-कवळे, विष्णू जोशी, देवानंद सोनटक्के, मल्हार अरणकल्ले, प्रा. राजकुंवर सोनवणे, बाळकृष्ण बाचल आणि प्रा. मधू जामकर यांना विशेष ग्रंथकार पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना यंदाचा मसाप जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक-सचिव डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेच्या १११ व्या वर्धापनदिनानिमित्त २७ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असून परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी शुक्रवारी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.
यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा सन्मान करताना परिषदेला आनंद होत आहे, असे जोशी यांनी या वेळी सांगितले. सु. प्र. कुलकर्णी यांनी ३२ वर्षे परिषदेच्या कार्यकारिणीवर नगर जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व केले असून दहा वर्षे ते महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मुखपत्राचे संपादक होते.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात परिषदेच्या चाळीसगाव शाखेला मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखिका आणि माजी कार्यवाह नंदा सुर्वे तसेच सातारा येथील शाहुपुरी शाखेचे कार्यकर्ते नंदकुमार सावंत यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमृतमहोत्सवी वर्षांत वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.