महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या वेळी मतदार याद्यातील घोळ काही ठिकाणी समोर आला. मतदार यादीत काही मतदारांची नावे सापडत नव्हती, तसेच बदललेल्या मतदान केंद्रांमुळे मतदान करण्यास मतदारांनी उत्साह दर्शविला नाही. त्यामुळे या घोळाचा फटकाही मतदानाला बसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान झाले. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार यादी, नाव नोंदणी, दुबार नावे काढून टाकण्याची प्रक्रिया अशी कामे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून हाती घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर ती प्रभागनिहाय फोडण्यात आली. प्रभागांची फेररचना होऊन चार सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आल्यामुळे पहिल्यापासूनच मतदार याद्यातील घोळ समोर येण्यास सुरुवात झाली. प्रथम ऑनलाईन पद्धतीने मतदारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रारूप यादी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रसिद्ध करून त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्यावर मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचनाही प्राप्त झाल्या. त्यामुळे मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यास प्रशासनाला विलंब झाला. त्यानंतरही मतदार यादीतील घोळ संपुष्टात आला नाही. मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीन वेळा अंतिम यादी बदलण्यात आली. निवडणुकीपूर्वी जवळपास १९ प्रभागातील मतदार याद्यांमध्ये प्रशासनाकडून बदल केला होता.

या बदललेल्या यादीनुसार अनेकांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याचे पुढे आले. अनेक ठिकाणी एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर टाकण्यात आली. तर काही ठिकाणी वेगळ्याच प्रभागात ही नावे गेल्याचे मतदानादिवशी आढळून आले. त्यातच यंदापासून व्होटर स्लीप वाटण्याचे काम प्रशासनावर सोपविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. प्रशासनाकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे काम सुरू होते. मतदानापूर्वी व्होटर स्लीपही न पोहोचल्यामुळे मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती मतदारांना मिळू शकली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रातही या निवडणुकीसाठी बदल करण्यात आला. त्यामुळे दीड ते दोन किलोमीटर अंतराची पायपीट मतदारांना करावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्याचाही फटका मतदान प्रक्रियेला बसल्याचे दिसून येत आहे. कुटुंबातील तीन व्यक्तींचे मतदान केंद्र एक, तर उर्वरित एकाचे दुसऱ्या प्रभागात किंवा दुसऱ्या मतदान केंद्रात असा अनुभवही काही मतदारांना आला.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासकीय पातळीबरोबरच स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत होती. त्यामुळे यंदा हे प्रमाण वाढेल, असा दावाही करण्यात येत होता. मात्र मतदानाचे प्रमाण ५५.५० टक्क्य़ांपर्यंत मर्यादित राहिले. मतदार याद्यांबाबत, नावांबाबत तक्रारी आल्याची कबुलीही प्रशासनाकडून त्यानंतर देण्यात आली होती. त्यामुळे घटत्या मतदानाला मतदार याद्यातील घोळ आणि प्रशासकीय दिरंगाई हे घटकही कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.