मद्यपी आरोपी सीसीटीव्हीत कैद

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पुन्हा दिसून आले. सोमवारी पहाटे िपपरीतील महेशनगर, नेहरूनगर व भोसरी एमआयडीसी परिसरात सुमारे १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. एका मद्यपी आरोपीने रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक व मोठे दगड टाकून वाहनांच्या काचा फोडल्याचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही तोडफोड झाली. िपपरीतील महेशनगर, नेहरूनगर परिसरातील वाहने या मद्यपी आरोपीने फोडली. त्यानंतर त्याने भोसरी एमआयडीसी परिसरातील वाहने फोडली.

रस्त्यावर लावलेल्या आलिशान मोटारी, पीएमपी बस, खासगी प्रवासी बस व अन्य चार चाकींचा यामध्ये समावेश आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दुचाकीवरून आलेल्या एका मद्यपी आरोपीने हा उद्योग केल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावरील सिमेंटचे ठोकळे व मोठे दगड टाकून त्याने या मोटारींच्या काचा फोडल्या आहेत. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे सावट

दर महिन्याला एक याप्रमाणे शहरात तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या मोटारी अशा घटनांमध्ये लक्ष्य ठरत आहेत. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी तोडफोडीच्या घटना कमी न होता वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.