शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर नवे स्थानक; महामेट्रो संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेच्या रचनेमध्ये अंशत: बदल करण्यात येणार आहेत. तसेच पिंपरी ते स्वारगेट आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील स्थानक शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर करण्याचाही निर्णय महामेट्रोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी दिल्लीत घेण्यात आला. पीएमपीच्या पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील दहा बसथांब्यांवर प्रवासी केंद्रीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १२३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाला मान्यता देताना मेट्रोचे काम महामेट्रो कंपनीमार्फत केले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महामेट्रो या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार महामेट्रोच्या संचालक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी दिल्ली येथे झाली. महामेट्रोचे अध्यक्ष आणि केंद्रीय नगरविकास विभागाचे मुख्य सचिव राजीव गौबा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार या बैठकीत उपस्थित होते.

पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी दहा स्थानकांच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव या बैठकीपुढे ठेवण्यात आला होता. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गात अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे हा मार्ग आता नदीपात्राजवळून जाणार आहे. त्यातून महामेट्रोची सुमारे २३० कोटी रुपयांची बचतही होणार आहे.

पुणे आणि िपपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत पीएमपी सक्षमीकरणाअंतर्गत प्रवासी केंद्रित पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या सुविधा निर्माण झाल्या, तरच मेट्रोची प्रवासी संख्याही वाढेल. त्यासाठी १२३ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली. मेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट, हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गाचे स्थानक शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर करण्याचे निश्चित झाल्यामुळे आर्केलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (एएसआय) या स्थानकाची गरज राहणार नाही. शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेवरच तीन मेट्रो मार्गाचे इंटर चेजिंग स्टेशन होणार असल्यामुळे खर्चातही बचत होणार आहे. या बचतीमधूनच पीएमपीच्या प्रवासी केंद्रित सुविधांवर खर्च होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पुढील बैठकीमध्येही सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच बोधचिन्ह (लोगो) असावे यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मेट्रो प्रकल्पासाठी महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे तर पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात बीआरटी मार्ग सुरू झाले आहेत. पुणे महापालिकेकडून सायकल आराखडय़ाच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे हे तिन्ही प्रकल्प भविष्यात एकमेकांना पूरक ठरतील त्या दृष्टीने एकात्मिक आराखडा (इंटर-मॉडेल इंटीग्रेटेड प्लॅन) धोरणावरही चर्चा होऊन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहतूक व्यवस्था सुधारणार

  • पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी १२३ कोटींच्या खर्चालाही मान्यता
  • पिंपरी-स्वारगेट, हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील स्थानक शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर
  • शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेवरच तीन मेट्रो मार्गाचे ‘इंटर चेजिंग’ स्टेशन
  • शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच बोधचिन्ह करणार