निवडणुकीतील इच्छुक समर्थकांची भाऊगर्दी; भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली

नोटाबंदीच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीच्या माध्यमातून खासदार संजय काकडे यांनी रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षात सक्रिय झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या रॅलीमध्ये काकडे समर्थक इच्छुकांसह काकडे यांना मानणाऱ्या काही नगरसेवकांचा सहभाग राहिला. पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरविली. त्यामुळे ही रॅली नक्की नोटाबंदीच्या पाठिंब्यासाठी होती की शक्तिप्रदर्शनासाठी होती, अशी चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये रंगली होती.

पाचशे आणि हजार रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी रॅली काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र रॅलीत काकडे यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळेच ही रॅली चर्चेत राहिली. काकडे यांना मानणाऱ्या काही नगरसेवकांसह इच्छुकांचीच या रॅलीत मोठी उपस्थिती असल्याचे दिसून आले. त्यामुळे इच्छुकांच्या शेकडो समर्थकांनी रॅलीमधील गर्दी वाढविली असली तरी केवळ खासदार काकडे यांच्या माध्यमातून तिकीट मिळविण्यासाठीच रॅलीला ही गर्दी झाल्याचेही दिसून आले. भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर खासदार काकडे यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचे ‘सर्वच स्तरावर’ योग्य नियोजन करण्यात आल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संजय काकडे यांच्या पुढाकारातून काही दिवासांपूर्वी पक्षप्रवेश झाले होते. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अंधारातून ठेवून हे पक्षप्रवेश झाल्यामुळे भाजपमध्ये कमालीची नाराजी होती. त्यातच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही पक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आले होते. त्यामुळे नोटाबंदीच्या समर्थनार्थ ही रॅली नव्हती तर शहर नेतृत्वाच्या आणि वर्चस्वाच्या लढाईसाठीच होती, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

रॅलीमुळे पदपथही  झाले अस्वच्छ

रॅलीमध्ये मिनरल वॉटरच्या लहान बाटल्या आणि ग्लुकोज बिस्किटांचे पुडे मोठय़ा प्रमाणावर वाटण्यात आले. टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चौकात, स. प. महाविद्यालयासमोर तसेच रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी त्याचे वाटप सुरू होते. बिस्किटांचे पुडे मिळवण्यासाठी मोर्चातील सहभागी मंडळी प्रचंड गर्दी करताना दिसत होती. रॅली संपल्यानंतर संपूर्ण टिळक रस्त्यावर दुतर्फा पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. यातील बहुतेक बाटल्या अर्धवट पाणी पिऊन फेकून दिलेल्या होत्या. अनेक ठिकाणी पदपथांवरही या अर्धवट पाणी संपवलेल्या बाटल्या अस्ताव्यस्तपणे फेकण्यात आल्या होत्या. अर्धवट खाल्लेले बिस्किटांचे पुडेही तसेच फेकून दिलेले अनेक ठिकाणी आढळले. त्यामुळे रॅलीमुळे शहरातील पदपथ अस्वच्छ झाल्याचे दिसून आले.