वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला मिळविण्याचा अधिकार वीज वितरण कंपनीला आहे व त्याचबरोबरीने वीजबिल भरणे ही  ग्राहकाची जबाबदारी आहे. घरगुती व प्रामाणिक वीजग्राहक जबाबदारीने वीजबिल भरत असताना अनेक बडय़ा वीजग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अशाच प्रकारचे दोन बडे वीजग्राहक महावितरण कंपनीच्या जाळ्यात सापडले.. विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून तब्बल तेरा लाखांहून अधिक वीजचोरी झाल्याचे त्यातून लक्षात आले. या ग्राहकांना चांगलाच झटका देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजचोरांना पकडण्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र पथक कार्यरत करण्यात आले आहे. विविध संशयीत ग्राहक व इतर माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहकांच्या वीजवापराची तपासणी या पथकामार्फत केली जाते. मीटरमध्ये वीजवापर नोंदविला जाणार नाही किंवा कमी प्रमाणात नोंदवला जाईल, अशा प्रकारे मीटरमध्ये फेरफार केला जातो. त्या माध्यमातून होणारी वीजचोरी ही थेट वीजचोरीच्या प्रकारात मोडते. त्याचप्रमाणे घरगुती कारणासाठी वीजपुरवठा घेऊन त्याचा वापर व्यावसायीक कारणासाठी केल्यासही ती वीजचोरी ठरते. या दोन्ही प्रकारच्या वीजचोरीबाबत भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात.
महावितरणच्या वीजचोराविरुद्धच्या मोहिमेमध्ये मागील तीन दिवसामध्ये दोन मोठय़ा वीजचोऱ्या सापडल्या. सांगवी उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वाकड भागामध्ये अनिल सुदाम भूमकर यांच्या नावे असलेल्या वाणिज्यिक वीजजोडातून तब्बल आठ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. या वाणिज्यिक मीटरमध्ये फेरफार करण्यात आला होता व चोरलेली वीज सिल्व्हर स्पून या हॉटेलसाठी वापरण्यात येत होती. या मीटरमधून ४० हजार ५०० युनिटची वीजचोरी झाल्याचे आढळून आले.
दुसऱ्या एका प्रकरणामध्ये भोसरीच्या औद्योगिक वसाहतीमधील सिपी पॉलियुरेटिन्स या कंपनीत वीजचोरी पकडण्यात आली. ही कंपनी महावितरणची उच्चदाब ग्राहक आहे. कंपनीत वापरल्या जाणाऱ्या विजेची नोंद मीटरमध्ये होऊ नये, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. या कंपनीने २६ मार्च ते २० एप्रिल २०१५ या कालावधीमध्ये तीस हजार युनिटच्या तीन लाख ५९ हजार रुपयांच्या विजेची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीला या रकमेचे स्वतंत्र वीजबिल देण्यात आले. त्याचा भरणा कंपनीने केला असला, तरी वीजचोरी केली असल्याचे कंपनीचे संचालक सुभाष सिपी यांच्यासह तिघांवर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.