अप्पर कोंढवा रस्त्यावरील अंबिकानगरमधील घटना
अप्पर कोंढवा रस्त्यावरील अंबिकानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून केलेल्या गोळीबारात पाच वर्षांच्या मुलासह दोघे जखमी झाले. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
समर्थ बाळू लोंढे (वय ५) आणि विनायक अशोक माने (रा. अंबिकानगर) हे या घटनेत जखमी झाले आहेत. या प्रकरणी नितीश पतंगे (वय २४, रा. साईनगर, अप्पर कोंढवा रस्ता) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फारुख शेख (रा. अंबिकानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नितीश व आरोपी फारुख हे एकमेकांचे शेजारी आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्याच भांडणातून बुधवारीही त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास अंबिकानगर परिसरातील अप्पर कोंढवा रस्त्यालगत फारुखने त्याच्याकडील पिस्तूल काढून ते नितीशच्या छातीवर रोखले. त्यामुळे नितीशचा मित्र विनायक याने मध्यस्थी करीत त्यांचे भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. फारुखने पिस्तुलातून गोळी झाडताच विनायकने त्याला ढकलले. त्यामुळे गोळी विनायकच्या हाताच्या तळव्याला लागली. दुसरी गोळी झाडली असता ती तेथून जात असलेल्या समर्थ या पाच वर्षांच्या मुलाच्या पायाला चाटून गेली. गोळीबार केल्यानंतर फारुख दुचाकीवरून पसार झाला.