मोहने परिसरातील मोहिली ते वरप या दोन गावांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील उड्डाणपुलाला शासनाने मंजुरी दिली आहे. या पुलामुळे मोहने, आंबिवली, टिटवाळा परिसरातील वाहनचालकांना कल्याण शहरात न येता थेट उल्हासनगर शहरात जाणे शक्य होणार आहे. हा पूल उभारण्यात यावा म्हणून मागील दहा वर्षांपासून या भागातील लोकप्रतिनिधी आग्रही होते.
कल्याण, टिटवाळा शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. मोहने, आंबिवली, बल्याणी, गंधारे, शहाड परिसर नागरीकरणामुळे विस्तारत चालला आहे. या वाढत्या वस्तीमधील लोकवस्ती, तेथील वाहने यांचा भार येणाऱ्या काळात कल्याण शहरावर पडणार आहे. या भागातील रहिवाशांना उल्हासनगर येथे जायचे असेल तर त्यांना कल्याणमध्ये येऊन मगच उल्हासनगर शहरात जावे लागत होते. कल्याणमधून उल्हासनगर, मुरबाडकडे जाणाऱ्या वाहनांची वाढत्या वर्दळीमुळे नेहमीच या भागात वाहतूक कोंडी होत असते. यातून मार्ग काढावा यासाठी उल्हास नदीवरील मोहिली ते वरप गावादरम्यान उड्डाणपूल झाला तर कल्याणमधील वाहतुकीची वर्दळ कमी होईल, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आली होती. या भागातील आमदार किसन कथोरे यांनीही यासंबंधीचा प्रस्ताव शासनापुढे मांडला होता.
दरम्यान, या पुलाच्या कामासाठी सुमारे साडे पाच कोटी खर्च येणार आहे. या पुलामुळे कांबा, वरप, म्हारळ, मोहने, बल्याणी, आंबिवली, गंधारे परिसरातील रहिवाशांना उल्हासनगर किंवा मुरबाडकडे जाता येणार आहे. या पुलाच्या उभारणीस राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी तत्त्वत मंजुरी दिली आहे.