पुढील आठवडय़ात येणाऱ्या होळी आणि रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीतील औद्योगिक विभागाजवळील खंबालपाडा भागात केडीएमटी बस आगाराच्या बाहेरून वाहणाऱ्या नाल्यात रंगाच्या पिशव्या सापडल्या आहेत. स्थानिक मुलांनी या रंगाने आधीच रंगपंचमी साजरी केली आहे. मात्र ते रंग तेथे नेमके कोठून आले आणि आरोग्यास हानीकारक आहेत का, याची माहिती नसल्याने परिसरातील नागरिकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. याबाबत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.   
या नाल्याजवळून एक जलवाहिनी गेली आहे. जवळच्याच परिसरात राहणारी काही कचरा वेचक मुले कचऱ्यातून गोळा केलेल्या पिशव्या या जलवाहिनीमधून गळणाऱ्या पाण्याखाली धुतात. यामुळे नाल्याच्या बाजूला कायम पिशव्यांचा खच पडलेला दिसतो. रविवारी सकाळीच कोणी तरी रंगाच्या पिशव्या येथे टाकल्या. धूलिवंदन आणि रंगपंचमी जवळच आल्याने मुलांना रंग खेळण्याचा मोह आवरला नाही. औद्योगिक विभागात खाण्याचे रंग बनविणाऱ्या आणि अन्य कामासाठी रंग वापरणाऱ्या कंपन्याही आहेत. हे रंग रंगपंचमीत खेळले जाणारे रंग आहेत की औद्योगिक विभागातील कंपन्यांमधील आहेत याची कोणालाच माहिती नाही. त्यामुळे मुलांना अपाय होण्याची शक्यता आहे.