कुळगांव-बदलापूर नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हे पाचही रुग्ण शहराच्या वेगवेगळ्या भागांतील आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयात ५ जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगतिले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यवाहीचे दावे फोल ठरल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शहरात मलेरियाचे रुग्णदेखील आढळत असून गेल्या महिन्यात ही संख्या ६ होती, असे डॉ. अंकुश यांनी सांगितले. तसेच या आजारांसारखी लक्षणे असलेले अनेक रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. यावर उपाय म्हणून डेंग्यू व मलेरियाच्या डासांची संभाव्य उत्पत्ती होण्याच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाकडून आलेले मलेरिया निर्मूलनाचे आठ कर्मचाऱ्यांचे पथक शहरभर पाहणी करीत आहे. तसेच डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी मार्गदर्शन करणारी पत्रके आम्ही शहरभर वाटत आहोत, अशी माहिती डॉ. अंकुश यांनी दिली. मात्र हे सर्व उपाय दरवर्षी करूनही शहरात डेंग्यूचे व मलेरियाचे रुग्ण आढळत असल्याने पालिकेच्या शहरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.