‘वक्ता दशसहस्रेषु’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत रिद्धी म्हात्रे विजयी
खारकर आळीतील एनकेटी महाविद्यालयाचा परिसर.. ठाण्यातील जाणत्या श्रोत्यांनी भरलेला सभागृह.. मुद्देसूद, विचारपूर्वक परंतु ठाम मते मांडणारी तरुणाई.. असे वातावरण रविवारी ठाणेकरांना अनुभवण्यास मिळाले.. निमित्त होते अर्थातच ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी. स्पर्धेचे विषयही पुरस्कार वापसी, शेती की उद्योग, भारत संघराज्य आहे का?, साहित्य संमेलनाने काय साधते? आणि कोलावरी ते शांताबाई असे दर्जेदार.. अत्यंत वेगळे विषय असलेल्या या स्पर्धेतील प्रत्येक विषयांना स्पर्श करत आजच्या पिढीतील तरुणांनी आपल्या विचारस्वातंत्र्याची आणि उत्स्फूर्ततेची चुणूक मान्यवर परीक्षकांना घडवली. यात बाजी मारली ती पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयाच्या रिद्धी म्हात्रे या विद्यार्थिनीने.
ठाण्यातील विभागीय अंतिम फेरीला रविवारी झोकात सुरुवात झाली. स्पर्धेची विजेती ठरलेली रिद्धी म्हात्रे हिने ‘पुरस्कार वापसी’ या विषयावर विचार मांडताना लोकमान्यांच्या या देशात राहणारे विचारवंत शब्दांनी लढण्याची परंपरा विसरले आहेत किंवा त्यांचे शब्द तरी संपलेले आहेत, अशी उद्विग्नता व्यक्त केली. देशाच्या ध्येय धोरणावर नियंत्रण ठेवण्याची ताकद पुरस्कार प्राप्त व्यक्तीत आहेत की व्यक्तीच्या कार्यात आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्याचे उत्तर अभिव्यक्तीतूनच देणे आवश्यक असल्याचे मत रिद्धीने नोंदवले. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर त्याच्यावरील टीकेचे उत्तर त्याच्या खेळातून देतो त्याच प्रमाणे विचारवतांवर होणाऱ्या हल्ल्याचे उत्तर हे त्यांनी त्यांच्या लेखणीतून देण्याची गरज असल्याचे विचार रिद्धीने मांडले.
तर भारताच्या निर्मितीचा मुख्य उद्देश साध्य होत असेल भारत हे संघराज्य आहे की एकात्मिक याला महत्व राहत नाही, असे मत द्वितीय पारितोषिक विजेता स्वानंद गांगल याने व्यक्त केले. ‘शेती की व्यवसाय’ या विषयावर बोलताना शेती आणि उद्योग यांच्यामध्ये तुलना करण्यापेक्षा शेती व्यवसायाकडे उद्योगाच्या दृष्टीने पाहून शेतीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत तृतीय क्रमांक विजेता अविनाश कुमावत याने व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या विषयांना अनेक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या तरुणांनी या निमित्ताने केला. तर या स्पर्धेसाठी उपस्थित रसिकांनी आपल्याला आवडलेल्या मुद्दय़ाला टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दाद देत होते.
वक्तृत्वाचा विषय मांडताना वक्त्याने त्यातून उपाय सुचवणे अपेक्षित नाही. तरीही एखाद्या विषयाच्या अंगाने वेगवेगळे पर्याय मात्र सुचवणे आवश्यक ठरते.
– अजित भुरे, नाटय़दिग्दर्शक.