पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी काचेच्या बाटलीतून मद्यविक्री; पेट व टेट्रा पॅकवर र्निबध; चोरटी मद्यविक्री टाळण्यासाठी निर्णय
पर्यावरण आणि मानवी आरोग्याला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर मद्याच्या आवेष्टनांकरिता होत असल्याने त्याचे विपरित परीणाम वाढीस लागले आहेत. याप्रकरणी सामाजिक संस्था आणि पर्यावरण स्नेही मंडळींनी उत्पादन शुल्क विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्यानंतर अखेर प्लास्टिकच्या बाटल्यांमधील मद्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आला आहे.
येत्या १ एप्रिल पासून राज्यभर हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र प्लास्टिकच्या बाटल्यामधून उत्पादित झालेला साठा संपेपर्यंत ३० जूनपर्यंत ही विक्री सुरू ठेवण्यात आली असून त्यानंतर राज्यभरातील प्लास्टिकच्या बाटल्यांमधून होणारी मद्याची विक्री पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यातील महत्वाची वनक्षेत्र, किल्ले, हिरवळीच्या जागा, नद्या, उद्याने आणि मोकळ्या जागावरील एकांताचा फायदा घेऊन मद्य प्राषण करून बाटल्या तेथे फेकणाऱ्या मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला मोठा फटका सहन करावा लागत असून अविघटनशिल असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या प्रदुषणाला कारणीभूत ठरत आहेत. या बाटल्यांची विल्हेवाट लागत नसल्याने गटारे-नाले, मलनि:सारण वाहिन्या आणि नद्यांमध्येही अडकून ते तुंबून सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. मद्यामध्ये मोठय़ाप्रमाणात अल्कोहोल असल्यामुळे प्लास्टिकसोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातील काही प्लास्टिक मद्य पिणाऱ्याच्या आरोग्यास हानी पोहचवत असते, असा दावा काही सामाजिक संस्थांकडून करण्यात आला होता. शिवाय प्लास्टिक वजनाने हलके असल्यामुळे या मद्याच्या बाटल्यांची तस्करी सहजतेने करता येत असल्याचे लक्षात येताच हे प्रकार थांबवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून होणारी मद्यविक्री थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्लास्टिक बाटल्यांबरोबरच टेट्रा पॅकमधूनही मद्यविक्री करण्यास उत्पादन शुल्क विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे केवळ काचेच्या बाटल्यांमधून मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये यासंदर्भात निर्णय होऊन १ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमधून होणारी मद्यविक्री यापुढे पुर्णपणे बंद करण्यात येणारा असून सध्या ३१ मार्च पुर्वी उत्पादित केलेल्या मद्याचा उपलब्ध असलेला साठा ३० जूनपर्यंत संपवून नंतर ही विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर केवळ काचेच्या बाटल्यांमधून मद्यविक्री करता येणार असल्याची माहिती राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. बिअरसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅनवर कोणत्याही प्रकारे र्निबध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कॅनमधून होणारी बिअर विक्री मात्र सुरू राहणार आहे.

मद्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या विक्रीवर बंदी
सध्या मद्याच्या ६० मिली, ९० मिली अशा छोटय़ा आकारमानाच्या मद्यांची प्लास्टिक बॉटलमधून विक्री केली जाते. तर एक लिटरच्या मोठय़ा आकारमानाच्या मद्याच्या प्लास्टिक बाटल्यांची विक्री केली जाते. रम, व्हिस्की, होडका, देशी मद्य आणि काही वाईनच्या बाटल्याही प्लास्टिकमध्ये उपलब्ध आहेत. सध्या याची विक्री सुरू असली तरी ३० जून नंतर ती विक्री पुर्णपणे बंद होणार आहे. परराज्यातून आयात होणाऱ्या मद्यासाठी सुध्दा हा नियम लागू राहणार असल्याने पर्यावरणाला काही अंशी दिलासा मिळणार आहे.

काचेच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीची सूचना..
राज्य आणि परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मद्य विक्रीच्या काचेच्या बाटल्यांवर ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता’ हे वाक्य उमटवण्याचा आदेशही या परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. देशी, विदेशी मद्य, बिअर, वाईन या सगळ्यावर हे वाक्य काचेत उमटवणे आवश्यक असून अशा बाटल्यांचा पुनर्वापर करता येऊ शकणार आहे. मद्याच्या बाटल्यांचे पुनर्वापर करतानाही त्याची स्वच्छता भारतीय मानके प्रमाणकांप्रमाणे होणे गरजेचे आहे. शिवाय या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीकरिता असे सुस्पष्ट लिहीण्यात येणार असल्याने मद्याची तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय फायद्याचा आहे.