व्हॅलेन्टाइन डे म्हणजेच प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी वसई नगरीतील तरुणाई सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठाही विविध भेटवस्तूंनी फुलल्या आहेत. विशेष म्हणजे नाशिक आणि कोल्हापूरमधील गुलाबपुष्प वसईच्या बाजारात दाखल झाली आहेत.
चॉकलेटचे नवीन प्रकार, शुभेच्छा पत्रे, टेडीबीअर, विविध आकर्षक भेटवस्तू आदी दुकानांमध्ये पाहावयास मिळत आहेत. अगदी १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छा पत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारची चॉकलेट दुकानांमध्ये मिळत आहेत. लाल रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल रंगात न्हाऊन निघाली आहेत. विविध वस्तूही लाल रंगाच्या आकर्षक वेष्टनात मिळत आहेत.
गुलाबपुष्प म्हणजे प्रेमाचे प्रतीक. त्यामुळे वसईतील बाजारपेठा गुलाबांनी फुलल्या आहेत. कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबांच्या मळ्यातून ही फुले मागविल्याने गुलाब विक्रेत्यांनी सांगितले.
व्हॅलेन्टाइन डेला प्रेमीयुगुल शहरातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, उद्याने येथील एकांताच्या ठिकाणी भेटतात. त्यामुळे अशा ठिकाणी पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. काही संघटनांचा व्हॅलेन्टाइन डेला विरोध असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.