नवीन वर्षांचं स्वागत म्हणजे जल्लोष, नृत्य, धिंगाणा, एकत्र जमून मस्ती अशी जणू प्रथाच आपल्याकडे रूढ झाली आहे. एक सूर्य अस्ताला गेल्यानंतर उदयास येत असलेला नवा सूर्य आपल्यासोबत ३६६ दिवसांचे आशाकिरण घेऊन येत असतो, ही जाणीव या हंगाम्यात कुठेतरी विरून जाते. नेमकं हेच भान राखत ठाण्यातील काही मंडळींनी एकत्र येऊन जुन्या काळातील संथ, सुरमय संगीताचा श्रवणानंद घेतला..
शांता शेळके यांनी सहाव्या सुखाची गंमत सांगितली आहे. त्या म्हणतात, दोन चिनी माणसं एकमेकांना भेटली म्हणजे परस्परांना अभीष्टचिंतन करतात, आणि तुम्हाला सहा सुखे मिळोत असे म्हणतात. यातली पाच सुखे कुणालाही आयुष्यात हवीशी वाटतील अशी म्हणजे आरोग्य, संपती, नावलौकिक, चांगला जीवनसाथी, मुले. लपून बसलेले सहावे सुख म्हणजे आनंदाचे निधान. ते ज्याचे त्यालाच कळायला हवे.
या ‘सहाव्या सुखाचा’ शोध आम्हाला सरत्या वर्षांच्या रात्री लागला. निमित्त होते सरत्या वर्षांला निरोप देऊन २०१६ चे स्वागत सूरमयी वातावरणात करण्याचे. ग्रामोफोनवरची काळी तबकडी गिरक्या घेऊ लागली आणि त्यातून शंभर नंबरी सोन्यासारखे सप्तसूर निनादू लागले. म्हणता म्हणता मैफिल तल्लीन झाली.
‘रघुवीर घरी येणार, कमळ फुलांच्या पायघडय़ावर कमलदले पडणार’, गजानन वाटावे यांच्या संगीत दिग्दर्शनाला न्याय देत सुधा माडगांवकर यांनी हळुवारपणे नावाशी इमान राखत अमृताची बरसात केली. आणि खरंच ‘आज कुणीतरी यावे’ हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकावला. बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजी उपोषणाला बसले होते. बडव्यांचं वाढतं प्रस्थ बघून सामाजिक भान ठेवत ‘विक्रय चाले देवपणाचा’ असं भाष्य करणाऱ्या ठाणेभूषण कवी पी.सावळाराम यांचे ‘पंढरीनाथा झडकरी आता’ हे गीत ऐकताना पंढरपुरात ते अजून लावलं जात नाही, ही बातमी कानांना ‘दे धक्का’ करून गेली. नंतर अंजनीबाई लावलेकर यांचा सतारीसारखा स्वर झंकारला ‘बलमाड’ या चिजेतून आणि सर्वाची गानसमाधीच लागली. यातून जागं केलं आशाताईंच्या हळुवार, आर्जवी स्वरातल्या, ‘राजा गोसावीची गोष्ट’ या चित्रपटातल्या या गीताने, ‘भाव फुलांची माला, वाहू कुणाला’. संगीतातील बादशाह म्हणावे अशा डी.व्ही.पालुस्करांच्या ‘रघुपती राघव राजाराम’ या अवीट गोडीच्या भजनातील चिपळ्या वाजवू लागले. ‘हो म्हणशील तर मज संजीवन, ना म्हणशील तर सरले जीवन’ या गदिमांच्या शब्दांना अशाताईंच्या स्वरांनी असं ‘संजीवन’ दिलं, की ‘सुखाची सावली’ हे चित्रपटाचे नाव त्याक्षणी अगदी सार्थ ठरलं. ‘सख्या सोड नां, राया सोड नां, तुझ्या हाताची मिठी जरा सोड नां’ं असा वनमालाबाईंचा ‘पायाची दासी’ चित्रपटातील लाडिक हट्ट कानांना खुलवून गेला.
‘राघू बोले मैनेच्या कानांत गं, चल सखे आंब्याच्या वनांत गं’ हे पी. सावळारामांचे पहिले ध्वनिमुद्रित गीत, नलिनी मुळगांवकर यांनी गायलेले. धुके जसे पसरावे तशा गीतांच्या ऐकीव आठवणी दाटून आल्या. शतकापूर्वीची सामाजिक परिस्थिती, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात जोडप्याला एकांत मिळत नसे. संकोचाचा जाड पडदा दूर करण्यासाठी गावाबाहेर पळावं लागे. राघू-मैनेच्या रुपकातून मांडलेल्या हा ‘गुलाबी गोडवा’ सगळ्यांना भावला. ‘कुणीतरी सांगा श्री हरीला, एकदा भेट राधिकेला’ या गीताचे स्वर निनादले आणि आशा भोसलेंची ‘ती मिंड’ ऐकताना ‘प्रेम आंधळं असतं’च्या संगीत दिग्दर्शकांना, राम कदम यांना मनोमन सलाम ठोकला गेला. ‘एक एक विरतो तारा, आसमंत ये आकारा, उभा देवराया क्षितिजावरती, उठी श्रीधरा रे सरली राती’ हे शांताबाईंचं ‘स्वप्न तेची लोचनी’मध्ये अनिल अहमद यांनी संगीत दिलेलं गीत म्हणजे तांबडं फुटण्याच्या वेळेचं चित्र. या चित्रात ‘दिशा सोनियाने अवघ्या न्हाती’ असं वास्तव तर ऐकणारे ‘सुमन’ या आवाजाच्या खडीसाखरी जादूत चिंब. हीच आवाजाची जादू ‘ऊठ मुकुंदा सरली रात्र, सोनपावली आली पहाट’ ह्य़ा मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दातून ‘सप्तपदी’मधे पुनप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. ‘रमला कुठे गं कान्हा’ या लिमये ह्य़ांच्या ‘हटके सुरांनी’ सगळ्यांना लिलया रमविले.
‘माझे जीवीचे आवडी, पंढरपुरा नेई गुडी, गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगले’, विठ्ठल रखुमाई चित्रपटातील बाबूजींचा हा आवाज ऐकताना ‘मन रंगलं नाही तरच आश्चर्य. राया मनांत रूप तुझं ठसलं’, असं प्रमोदिनी पाटकर यांनी ठणकावून सांगितलं, मग ऐकावंच लागलं. ‘प्रेम कशाला म्हणतात’ हे गीतकार रघुबंधूंनी ‘मी पतंग तू दोरा, मी तुषार तू जलधारा’ अशा शब्दांत सांगताच. संगीतकार राम कदम यांनी सुरांचं शिल्प घडवलं. जयवंत कुलकर्णी आणि उषा कीर्तने यांनी प्रभूची ही छान कल्पना सर्वाच्या कानात सांगताच एक लाजरा शहारा उमटला.
सुरांची ही सोबत, किती वेड लावणारी, देहभान विसरायला लावणारी, काळ्या तबकडीवर गिरक्या घ्यायला लावणारी, कंटाळा न आणणारी, सहवासाने मनात रुजणारी, खिळवून ठेवणारी, निर्भेळ आनंदाची उधळण करणारी. ‘तू सहज मला पाहिले, मी सहज तुला पाहिले’, ‘हळूच धर ना हात साजणा, पिचेल रे बांगडी’, ‘मला मुंबईची गंमत दाखवा’, ‘उदयाचली रवी आला उजळत दाही दिशांना’, ‘गोड तुझी बासरी श्रीहरी’, ‘याचे हातीचा वेणू कुणी घ्या गं’ असा एकापाठोपाठ एक गीतांचा धबधबा चालूच राहतो. मोहूनिया तुज संगे म्हणत श्रवणसुखाचा हा सिलसिला सुरूच राहतो. निरोपाची घटिका ओलांडून कालचक्र पुढे सरकते. २०१६चा शुभारंभ होतो.

– सुचित्रा साठे