मीरा-भाईंदरमधील २२ जण योजनेत सहभागी; वाहतूक पोलिसांना मदत
एरवी तृतीयपंथीयांना समाजाकडून हेटाळणीच्या भावनेलाच सामोरे जावे लागते. परंतु ‘पोलीस मित्र’ बनून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ पाहणाऱ्या तृतीयपंथीयांना मात्र चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पोलीस मित्र म्हणून सामील होण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला हाक देत मीरा-भाईंदरमधील २२ तृतीयपंथी या योजनेत सहभागी झाले असून पोलिसांच्या खांद्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
भावना व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहिसर चेकनाका येथे काही महिन्यांपूर्वीच पोलिसांच्या तावडीतून पळून जात असलेल्या चोराचा पाठलाग करून त्याची धरपकड केली होती. त्यावेळी आपणही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करू शकू, असे त्यांना त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते. भावना व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून चोराला पकडण्यात मदत केल्याबद्दल पोलीस दलाने त्यांचा खास सन्मान केला. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी ‘पोलीस मित्र’ म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी भावनाने आपण या योजनेत सहभागी होऊ इच्छित असल्याचे मत व्यक्त केले होते. तृतीयपंथी म्हणून आपल्या इच्छेला पोलीस किती गांभीर्याने घेतील याबाबत भावना यांना साशंकता वाटत होती. परंतु पोलिसांनी कोणताही भेदभाव न बाळगता भावना व त्यांच्या सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले. आज भावना व त्यांचे सहकारी पोलीस मित्र बनून पोलिसांना विविध कामांत मदत करत आहेत.
दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली नसली, तरी त्यांनी हेल्मेट वापरावे यासाठीचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. या कामी भावना व त्यांच्या सहकाऱ्यांची मोठीच मदत होते. एका तृतीयपंथीयाने हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे पोलीस आवर्जून सांगतात. याशिवाय पोलिसांसोबत रहिवासी इमारतींना भेट देऊन रखवालदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, उत्सवात अथवा मिरवणुकांमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पोलीस मित्रांची मोलाची मदत मिळत आहे.

पोलिसांनी केलेल्या आवाहनाला या तृतीयपंथीयांनी सकारात्मक साद दिल्याने पोलीस दलही त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा या तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याबाबत विचार सुरू आहे. – सुहास बावचे, उपअधीक्षक