६८ ऐवजी ९० मीटरच्या शिडीचे वाहन खरेदी करणार; पूर्वीची निविदा रद्द करण्याचे पालिका प्रशासनाला आदेश

बाजारात ९० मीटर उंचीच्या शिडीचे अत्याधुनिक वाहन उपलब्ध असतानाही ६८ मीटर उंचीच्या शिडीचे वाहन खरेदी करण्याचा प्रशासनाचा डाव अखेर हाणून पाडण्यात आला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनवर टीकेचा भडिमार केल्याने पिठासीन अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करत ९० मीटर उंचीची शिडी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात एक हजारहून अधिक इमारती ९२ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असतानाही अग्निशमन विभागाने मात्र ६८ मीटर उंचीची शिडी असलेले अग्निशमन वाहन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, बाजारपेठेत ९० मीटर उंचीच्या शिडीचे अत्याधुनिक वाहन उपलब्ध असल्याची आणि या दोन्ही वाहनांची किंमत जवळपास सारखीच असल्याची बाब समोर आली. ठाणे, कळवा, घोडबंदर परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यापैकी काही इमारती ९२ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असून अशा इमारतींचा आकडा एक हजाराहून अधिक आहे. अशा इमारतींची उभारणी करताना त्यामध्ये अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था निर्माण केली जाते. मात्र अशा इमारतींमध्ये शेवटच्या मजल्यावर आग लागली किंवा इमारतीत एखादी आगीची दुर्घटना घडली तर अनेक नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. अग्निशमन दलाच्या ताफ्यात ५५ मीटरपेक्षा अधिक उंचीची शिडी असलेले वाहन नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उंच इमारतीतील आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळा जीव धोक्यात घालून मदतकार्य करावे लागते. या पाश्र्वभूमीवर ६५ मीटरपेक्षा अधिक उंचीची शिडी असलेले वाहन खरेदी करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत अग्निशमन विभागाने वाहन खरेदीसाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली, मात्र बाजारपेठेत ९० मीटर उंचीच्या शिडीचे अत्याधुनिक वाहन उपलब्ध असतानाही ६८ मीटरच्या शिडीचे वाहन खरेदी करण्यात येत असल्याची बाब समोर आली. याच मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनावर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून ९० मीटर उंचीची शिडी असलेले वाहन खरेदी करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

तीन वर्षांत आठ केंद्रे

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १४ अग्निशमन केंद्रांची गरज आहे. प्रत्यक्षात शहरात सहा अग्निशमन केंद्रे आहेत. त्यामुळे उर्वरित आठ अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून येत्या तीन वर्षांत ही केंद्रे उभी राहतील, अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

३६० अंशांत वळणारी शिडी

६८ मीटर उंचीची शिडी केवळ ९० अंशापर्यंतच वळते तर ९० मीटर उंचीची शिडी ३६० अंशापर्यंत वळते. याशिवाय, ९० मीटर उंचीची शिडी हायड्रॉलिक असून तिची किंमत ६८ मीटर उंचीच्या शिडीइतकीच आहे. असे अनेक मुद्दे उपस्थित करत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.