पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठाणे महापालिकेची नवी योजना

ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी शाळा, रुग्णालये, मॉल आणि गृहसंकुलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने एक योजना तयार केली आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात वृक्षलागवड स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करणार आहे. यासोबत संपूर्ण शहरात २५ हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती नुकतीच स्थापन करण्यात आली असून, या समितीची बैठक मंगळवारी महापालिका आयुक्त व वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शहरातील वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यामध्ये समिती सदस्यांबरोबरच रहिवाशांचेही सहकार्य घेण्यात येणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर समितीमधील सर्व सदस्यांनी आपापल्या परिसरातील उद्याने, रस्ते वा पदपथ यांची जबाबदारी घेऊन त्या परिसरातील नागरिकांच्या सहभागातून वृक्षरोपण करावे आणि त्या वृक्षांचे संवर्धन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी यावेळी केले.

महापालिकांच्या शाळा, खासगी शाळा, रुग्णालये, मॉल आणि गृहसंकुलांमध्ये स्पर्धा घेण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्षलागवड मोठय़ा प्रमाणात व्हावी तसेच वृक्षसंवर्धन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत देता येऊ शकते का, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनुसार अशा प्रकारची स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक देण्यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्ता करात किती प्रमाणात सवलत देता येऊ शकते, याचा सखोल अभ्यास करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

झिरो अजेंडाबैठक

वृक्षनिधी हा यापुढे वृक्ष प्राधिकरणांच्या योजनांवरच खर्च करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोणतेही प्रस्ताव नसलेली झिरो अजेंडा बैठकही यापुढेही घेतली जाणार आहे. या शहरातील वृक्षांचे संवर्धन, लागवड व इतर उपाययोजना या महत्त्वाच्या विषयांवरच चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच समितीचा कारभार पारदर्शक असावा यासाठी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

२५ वृक्षांचे पुन्हा रोपण

वृक्ष प्राधिकरण समितीच्या नवीन धोरणानुसार तोडण्यात आलेल्या व पुन्हा लावण्यात येणाऱ्या अशा एकूण २५ हजार वृक्षांचे रोपण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच या वृक्षांचे पुन्हा रोपण झाले की नाही, याची तपासणी करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले आहे.