बाहेरुन बंदिस्त कारागृह पाहिले की सर्वसामान्यांना या कारागृहाविषयी उत्सुकता वाटू लागते. एकदा तरी आतून कारागृह पाहायला मिळावे, अशी सामान्यांची मनोमनी इच्छा असते. हीच उत्सुकता लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृह हैद्राबाद येथील संगारेड्डी कारागृहाच्या धर्तीवर ‘फील द जेल’ हा आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामुळे एक दिवस कैदी होण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दोन महिन्यांपूर्वी या उपक्रमासंदर्भात हैद्राबाद येथील संगारेड्डी कारागृहाला भेट दिली. त्या ठिकाणच्या उपक्रमाची त्यांनी  सविस्तर माहिती घेतली.

ठाणे, रत्नागिरी, सावंतवाडी येथील कारागृह ऐतिहासिक असल्याने या तीन ठिकाणी हा उपक्रम राबविण्याचा सिन्हा यांचा मानस आहे. या उपक्रमात सर्वसामान्यांना कारागृह पाहता तर येणार आहे, पण एक दिवसाचा तुरुंगवास भोगण्याची संधी मिळणार आहे. यात त्यांना कैद्यांचे कारागृहातील आयुष्य समजण्यास देखील मदत होईल. या उपक्रमात त्यांना कैद्यांचे कपडे, बिछाना, ताट-वाटी-पाट, कारागृहातील जेवण आणि एक दिवस तुरुंगात बंदिस्त करणार आहेत. यासाठी त्यांना ठराविक शुल्क आकारले जाणार आहे. कारागृहातील जेवणाचा दर्जा हा निकृष्ट असतो अशी बाहेर ओरड असते, पण येथील जेवण हे उत्तम प्रतीचे असते हेही यातून लोकांना समजण्यास मदत होईल, असे वायचळ यांनी सांगितले. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्डही त्यांना दाखविले जाणार आहे. या उपक्रमासाठी वेगळा विभाग करण्यात येणार असून याबबातचा प्रस्ताव तयार असून लवकरच हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून नागरिकांना हा उपक्रम नक्कीच आवडेल, असा विश्वास वायचळ यांनी व्यक्त केला.

तुम्हाला जर कैदी होण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय एका अटीची पुर्तताही करावी लागेल.  कोणत्याही स्वरुपाची गुन्हेगारी पाश्वभूमी नसेल, तरच तुम्हाला एक दिवसाचा कारावास भोगता येईल. कारागृहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची जाणीव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचे ठरेल, वायचळ यांनी यावेळी सांगितले.