पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नेदरलँडला भेट दिली. नेदरलँडची राजधानी हेगमध्ये मोदींनी राष्ट्राध्यक्ष मार्क रुट यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मार्क यांनी मोदींना एक अनोखी भेट दिली. पंतप्रधान मोदींना त्यांनी सायकल भेट दिलीय. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा फोटो शेअर केलाय. नेदरलँडमध्ये सायकल हे वाहतुकीचं अधिक फायदेशीर साधन मानलं जातं. सायकलमुळे व्यायामही होतो, प्रदूषणही रोखलं जातं म्हणून येथे लोकांची सायलकला अधिक पसंती आहे. एका अहवालानुसार नेदरलँडमधली ३६ टक्के जनता सायकलने प्रवास करते. म्हणूनच ही खास भेट मार्क यांनी मोदींना दिली.

मोदीं जेव्हा नेदरलँडमध्ये आले तेव्हा मार्क यांनी त्यांचं चक्क हिंदीत स्वागत केलं होतं. ‘नेदरलैंड्स में आपका स्वागत है @narendramodi भारत और नेदरलैंड्स के 70 साल के द्विपक्षीय रिश्ते के साथ मै हमारी बैठक के लिए बहुत उत्सुक हूँ’ असं ट्विट मार्क यांनी हिंदी भाषेत केलं होतं. तेव्हा मार्क यांच्या या मैत्रिपूर्ण भेटीने मोदीही खूश झाले. नेदरलँडला भेट देण्याआधी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली होती. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांना मोदींनी खास गिफ्ट दिले होते. एएनआयच्या वृत्तानुसार, मोदी यांनी मेलानिया यांना काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेल्या शाल भेट दिल्या. तसेच कांगडा खोऱ्यातील कारागिरांनी तयार केलेले चांदीचे ब्रेसलेट आणि चहापावडरही भेट दिली पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये प्रसिद्ध केलेला एक पोस्टल स्टॅम्पही भेट दिला. तसेच पंजाबमधील होशियारपूरमध्ये तयार केलेली खास लाकडाची पेटीही ट्रम्प दाम्पत्यांना भेट दिली होती.