आठवतोय का तुम्हाला? हो! हो! तेच माकड ज्याचं पोट एवढं सुटलं होतं की पोटाचा भार सांभाळता सांभाळता ज्याला दोन पावलंही चालता येत नव्हती. या अंकल फॅटीचे फोटो मे महिन्याच्या सुरूवातीला व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतला. इथे आलेल्या पर्यटकांनी जंक फूड खायला घालून त्याचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात घातलं होतं. आता या माकडाची पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आलीये आणि तिथे त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकांनी दिलेले कोल्ड्रिंक्स, जंक फूड, फळं खाऊन प्रमाणपेक्षा जाडजूड झालेल्या अंकल फॅटीला आता डाएट फूड खावं लागतंय.

इथल्या पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे इथल्या सगळ्याच माकडांचे आरोग्य धोक्यात आलंय. त्यातून आपल्या वजनापेक्षा तिप्पट वजनाचा असलेले हे माकड तर इथल्या मार्केटमधला आकर्षणाचा केंद्रबिंदूच होता जणू. पण याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही प्राणीप्रेमी संघटनांनी मिळून त्याच्यावर उपाचार करण्याचं ठरवलं. आता त्याला इथपर्यंत आणणंही काही सहज शक्य नव्हतं. हा अंकल फॅटी म्हणजे इथल्या माकडांच्या टोळीचा प्रमुख. तेव्हा त्याला पकडण्यासाठी प्राणीप्रेमी गेले असता या माकडांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण या टोळीला कसंबसं थोपवत त्याला पुनर्वसन केंद्रात आणण्यात आलं. आता लठ्ठपणामुळे या अंकल फॅटीला अनेक आजार जडलेत ते वेगळंच. या माकडाचे वजन साधारण १० ते १५ किलोच्या आसपास असते पण अंकल फॅटीचे वजन चक्क ६० किलो आहे. तेव्हा उपचार केल्यावर तो पूर्वीसारखा होणार का हे पाहण्यासारखं ठरेल.