‘लोकप्रभा’, १ एप्रिल २०१६ च्या अंकात निशांत सरवणकर यांच्या ‘इतकं सगळं आलं कुठून’च्या लेखात छगन भुजबळांनी इमानदारीने (?) जमवलेली माया, बंगले, कारखाने, सदनिका यांची यादी वाचल्यावर चक्करच आली. निवडून आल्यावर मंत्रिपदाची शपथ घेताना राज्याचा व जनतेचा विकास हेच उद्दिष्ट ठेवीन असे म्हणणाऱ्या भुजबळांनी मात्र स्वत:चाच विकास, तोसुद्धा गोपनीय पद्धतीने केला. त्यामुळे ते धन्यवादास (?) पात्र आहेत. त्यांच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना त्यांचा अभिमान वाटावा अशीच त्यांची कृती होती यात शंकाच नाही.

आपल्या देशात असे अनेक भुजबळ, मल्ल्या, सुब्रतो, कृपाशंकर आहेत. आपला देश म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा, घोटाळेबाजांचा देश म्हणून प्रसिद्ध होतो आहे. परवाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी जाहीरपणे कबूल केले की तब्बल १७ बँकांकडून कित्येक हजार करोड रुपये कर्ज घेऊन सुखरूपपणे विजय मल्ल्याने लंडनला प्रस्थान केले. याचा परिणाम देशाची आत व बाहेर बदनामी झाली आणि त्यामुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी होईल. सामान्य माणसांना लाख -दोन लाखांचे कर्ज द्यायला बँका खूप नियम सांगतात व परतफेडीकरिता रात्रंदिवस तगादा लावतात, पण मल्ल्याच्या बाबतीत तब्बल १७ बँका मात्र मूग गिळून बसतात. आणि मल्ल्या मात्र स्वत:चे वाढदिवस मोठय़ा थाटात साजरे करतो. जामीन मिळणे म्हणजे सुटका होणे असेच समीकरण या गुन्हेगारांना समजते.

सरकार कायद्याप्रमाणे चालते. जनता उघडय़ा डोळ्यांनी बघते आणि सहन करते. परिणाम, भ्रष्टाचार बोकाळतो. देशाची प्रगती खुंटते, प्रामाणिक कर्मचारी काम करायला बघत नाहीत. असो. भुजबळांचे काय होईल ते होवो (काय होईल याचा अंदाज पूर्वानुभवावरून कुणीही बांधू शकतो) पण देशाचे अतोनात नुकसान होते आहे हे विसरून चालणार नाही. प्रशासन, मंत्री, नेते यांची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होते आहे. ना खेद ना खंत. तुका म्हणे जे जे दिसते ते फक्त पाहावे व चित्ती असू द्यावे समाधान. हो, उगाच कशाला आपला बी.पी. वाढवायचा?
– भाऊराव हेडाऊ, नागपूर.

15-lp-cvrवाजले की बारा
जाणार, जाणार म्हणत, अखेर छगन भुजबळ तुरुंगात गेलेच. जे अटळ होते, ते शेवटी टळू शकले नाही. फुले, भाजी विकणारा, राजकारणात काय येतो, नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री, उपमुख्यमंत्री काय होतो, सारा प्रवास अजब, अभूतपूर्व होता. एकदा पैशाची चटक लागली की काय होऊ  शकते याचे भुजबळ म्हणजे जिवंत उदाहरण आहे. पैसा तो किती जमवायचा, मल्ल्यांनीही हेच केले, शेवटी कर्जबाजारी होऊन भिकेला लागला.

भुजबळ शिवसेनेत होते, तोपर्यंत बाळासाहेबांचा वचक होता, न मागता भरपूर पदे मिळत होती, बाळासाहेबांनी त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. भुजबळांनी शिवसेनेचा विरोधी पक्षनेता म्हणून एकहाती खिंड लढवली. असा निर्भीड नेता जाणत्या राजाने बरोबर निवडला, त्याच्या नादी लागले, मग पैशाच्या मागे लागले आणि हावदेखील वाढली, त्यांत जातीची ढाल प्रत्येक वेळी करीत आपला बचाव करू लागले आणि अधोगतीला सुरुवात झाली. पैशाची झिंग एवढी जबरदस्त होती, की सात जन्माची सोय करावयास निघाले, त्याबरोबर अनेक शत्रू निर्माण केले.

शेवटी फुले विकणाऱ्या छगन भुजबळांना आता बेल किती महत्त्वाची हे कळलेच. राजकारणातील यशानंतर छगनभाऊ  लोककल्याणाचा धडा विसरले, आणि घडय़ाळाकडे नजर लावून बसले. आता घडय़ाळाचे काटे उलटे फिरू लागले आहेत.

शेवटी वाजले की हो बारा..
-प्रफुल्लचंद्र पुरंदरे, आनंद विहार, वेसावे, मुबंई.

16-lp-cvrअप्रतिम अंक
‘लोकप्रभा’चा यंदाचा वर्धापन दिनाचा अंक आवडला. नेहमीप्रमाणेच या वर्षीचाही अंक वाचनीय होता. विविध विषयांवरील लेख अंकात समाविष्ट केल्यामुळे अंक परिपूर्ण झाला आहे. महाभारतावरील सगळे लेख उत्तम आहेत. या लेखांमध्ये मांडलेली माहिती यापूर्वी वाचनात नव्हती. त्यामुळे या लेखांमुळे ज्ञानात भर पडली. ‘केल्याने होत आहे रे’ हा विभागही चांगला झालाय. जिद्दीने एकाच गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांची कथा या सदरातून दिसून आली. ‘नास्तिकांचं जग’ या आगळ्यावेगळ्या लेखाचाही अनुभव चांगलाच होता. ‘युथफुल’ विभागांतर्गत असलेले सगळे लेख प्रेरणादायी आहेत. क्षितिज पटवर्धन आणि निपुण धर्माधिकारी या दोघांचंही काम सध्या यशाच्या दिशेने सुरू आहे. या टप्प्यावर त्यांची मुलाखत वाचणे म्हणजे पर्वणी होती. प्रिया बापट-उमेश कामत यांची मुलाखतही आवडली. वसंत व्याखानमाला ते टेड टॉक्स या लेखाने नव्या-जुन्याबाबत योग्य ते भाष्य केलं आहे. एकुणात अंक नेहमीप्रमाणे उत्तम झाला आहे. वर्धापन दिनाच्या अंकातील लेख वैशिष्टय़पूर्ण असतात, त्यामुळे त्यात अधिकाधिक लेख वाचायला मिळाले तर नक्कीच आवडेल.
सुशीला देशमाने, रत्नागिरी.

माहितीपूर्ण अंक
‘लोकप्रभा’ ८ एप्रिलचा रिअल इस्टेटचा अंक वाचनीय होता. महाराष्ट्रातील आढावा घेतल्यामुळे राज्यभरातील परिस्थिती सामान्य वाचकांपर्यंत पोहोचली. अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट होताना दिसतेय. पण, ते पूर्णत्वाला कधी जातं, मुळात ते पूर्ण होतं का असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय काही ठिकाणी केवळ नव्याकोऱ्या बिल्डिंग दिसतात पण, वर्षांनुवर्षे तिथे कोणीही राहायला येत नाही असे दिसून येते. याबाबतचंही चित्र या लेखांमधून समोर आलं. वैशाली आर्चिक यांचे चारही लेख मार्गदर्शनपर ठरले. घर निवडावं कसं, वृद्ध मंडळींच्या सोयीने बांधणी कशी असावी, सेकंड होमचं नियोजन केलं तर कधी-कसं, घरातील वस्तूंची रचना कशी असावी; या सगळ्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले. घर घेताना कर्ज घेताना लोक थोडेफार गोंधळतात. त्याची माहिती देणारा ‘गृहकर्ज घेताना’ हा लेख उत्तम आहे. कलाकारांचे घर घेतानाचे अनुभव मनाला भिडले. विद्याधर कुलकर्णीनी सजवलेल्या घराचं वर्णन करणारा लेख प्रेरणा देणारा ठरला आहे. ‘घरातील बाग’ हा लेख देखणा आणि वाचनीय झाल्यामुळे ‘लोकप्रभा’चा वाचकवर्ग सुखावला आहे.
– नितीन साळुंखे, कल्याण.

17-lp-cvrजागृती हाच खरा महिला दिन
‘लोकप्रभा’च्या १८ मार्चच्या  ‘मनमुक्ता’ या सदरातील अरुंधती जोशी यांचा ‘अनुदिन महिला दिन’ हा लेख वाचनीय आहे. प्रत्येक  वयोगटाचं व प्रत्येक स्तरावरच्या महिलांची फ्रेम त्यांनी प्रेषित केली. खरंच आहे की कशाला हवा हा महिला दिन? जसा पोळा, तसाच हा दरवर्षी साजरा केला जाणारा (१०५ वर्षांपासून) महिला दिन. माझे काही मुद्दे असे आहेत –

१)     आजही कामगार महिलांना महिला दिन साजरा करायला वेळ नसतो.

२)     आजही ‘ती’चं घर नसतं. नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या घरातली ती पाहुणी. ‘रजिस्ट्री’ तिच्या नावावर असली तरी ते विकायचा हक्क फक्त तिच्या नवऱ्याचा किंवा मुलांचा. ती फक्त सही करणार एवढंच.

३)     मुलींचा पाठोपाठ जन्म झाल्यानंतर तिचा तिरस्कार आजही केला जातो.

४)     ती जर कमी पगाराची (प्रायव्हेट कंपनी वा संस्थेत) नोकरी करीत असेल तर ती आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी नाही.

५)     दारूडय़ा व मारहाण करणाऱ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊ शकत नाही. ती एकाकी आहे पाहून दुसरे अनेक दारूडे तिला सोशल प्रॉपर्टी समजतात.

६)     आमदार, खासदार किंवा पंचायती राज्यातल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष स्त्री स्वनिर्णय घेऊ शकत नाही. (हे सत्य यंदाच्या महिला दिनी न. पा.च्या महिला अध्यक्षाने सर्वासमोर स्वीकारले आहे.)

७)     ‘निर्भया’चे धिंडवडे तर सर्वच जग बघत आहे.

८)     तिचं दान (कन्या) का होतं?

९)     तिच्या शिक्षणाचा निर्णय सर्वस्वी तिचा का नसावा?

लेखिकेने शेवटी म्हटलंय की, महिला दिनाची गरजच उरणार नाही तो खरा साजरा करण्याचा दिवस. जी स्वत: सर्वात आधी घरामध्ये जागी होते व सर्वाना जागं करते, पण स्वत: मात्र स्वत:च्या अधिकारांबद्दल जागृत नसते.

ती जागृत होईल तो खरा महिला दिन.
– संध्या बायवार, बानपुरा, जि. हौशंगाबाद (म. प्र.)

बिट्टी म्हणजे सागरगोटे नव्हे
१८ मार्चच्या अंकातील ‘आठवणीतला आसमंत’ या लेखात ‘बिट्टी झाडाच्या बिया म्हणजेच सागरगोटे’ असे विधान केले आहे. पण ते चुकीचे आहे. सागरगोटय़ाचे वेल असतात. असे वेल महाराष्ट्र निसर्ग उद्यानच्या कंपाऊंडवर सोडलेले आहेत. सागरगोटय़ाच्या वेलाला खूप काटे असतात त्यामुळे त्याचे चांगले कंपाऊड होऊ शकते. बिट्टीच्या झाडाची फळे सागरगोटे म्हणून कोणी खेळत असलेही पण ते सागरगोटे नव्हेत. सागरगोटे गोल मण्यांसारखे पांढरट, मातकट रंगाचे असतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव माहीत नाही.
– नीला पटवर्धन, मालाड, मुंबई.

मूळ सागरगोटे खेळण्यासाठी ‘बोंडुक नट’ नावाच्या ‘सिसालपेनिए बोंडुसेला’ कुटुंबातल्या सदस्याच्या सुकलेल्या बिया वापरल्या जातात. ही वनस्पती सर्वत्र उपलब्ध नसल्याने हिच्या बियांसदृश्य दिसणाऱ्या काही बियांना अनेक ठिकाणी बोलीभाषेत सागरगोटे उल्लेखले जाते. अनेकांनी सागरगोटे म्हणजे काय, हे पाहिलेलेच नसतात. पण मागच्या पिढीकडून बोलीभाषेतील प्रचलित शब्द पुढे वापरात येत राहतो, जसं काचपाणी, गोटय़ा आणि ठिक्कर किंवा ठिकरी. ठिकरी या शब्दाला साधम्र्य दाखवणाऱ्या कुठल्याही चपटय़ा गोष्टीला खेळताना बोलीभाषेत ठिकरी असेच उल्लेखले जाते. त्याचप्रमाणे सागरगोटय़ांशी साम्य राखणाऱ्या बिट्टीच्या बियांनाही अनेक ठिकाणी सागरगोटे अथवा बिट्टीगोटे असे उल्लेखण्यात येतं. सागरगोटय़ाच्या बीला कटुकारंजाची बी म्हणूनही ओळखण्यात येतं. कोकणात याच्या वेली मोठय़ा प्रमाणात आढळतात. शास्त्रीय नावांपेक्षा अनेकदा बोलीभाषेतील मजेशीर नावंच प्रचलित होतात ते असं.
– रुपाली पारखे-देशिंगकर.