ws14मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ‘भाऊचा धक्का’ आता १७५ वर्षांकडे वाटचाल करत आहे. या बंदर उभारणीचे आव्हानात्मक काम करणारे बांधकामतज्ज्ञ भाऊ लक्ष्मण अजिंक्य यांच्या खडतर जीवन प्रवासासहित हे बंदर-धक्का उभारणीतील त्यांची कल्पकता, द्रष्टेपणा आणि प्रत्यक्ष बांधकामाचा आढावा या लेखातून घेतला आहे. मुंबई बंदराशी संबंधित हा परिसर ‘भाऊचा धक्का’ म्हणून समाजमनावर ठसला आहे.
१९ ६० साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून मुंबई कुणाची? या संवेदनशील प्रश्नावर अनेकदा आंदोलनं, चर्चा, परिसंवाद होतच असतात. पण १९व्या शतकापासून अनेक चेहऱ्यांच्या मुंबई महानगरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवून देणाऱ्या दिग्गज, द्रष्टय़ा माणसांची नामावली आपल्या नजरेसमोर क्वचितच येते. नाना शंकर शेट, दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, फिरोजशा मेहता, प्रेमचंद रायचंद, करसनदास मुळजी, डेव्हिड ससून, विश्वनाथ मंडलिक या एकसेएक टोलेजंग माणसांच्या पलटणीत ‘भाऊ’ नावाची लोकप्रिय झालेली दोन दूरदृष्टीची मराठी माणसं म्हणजे मुंबई शहराचा गौरव आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक जाणिवेनी आणि पुरोगामी विचारसरणीनी लोकोपयोगी अनेक उपक्रम राबवणारे डॉ. भाऊ दाजी लाड आणि मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सागरी वहातुकीकरिता मुंबई बंदर उभारणारे प्रख्यात बांधकामतज्ज्ञ भाऊ लक्ष्मण अजिंक्य हीच ती दोन दिग्गज माणसं..
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेल्या पाठारे प्रभू ज्ञातीतील लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांचा जन्म रायगड जिल्ह्य़ातील उरण नजिकच्या करंजा या गावी इ.स. १७८९ साली झाला. ६९ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या भाऊ अजिंक्य यांनी प्रारंभी उमेदवारीच्या काळात मुंबईत कुलाबा येथील गनर्केरिएज कारखान्यात अव्वल कारकून म्हणून जम बसवला होता. युद्ध साहित्य व यंत्र बनवणाऱ्या या कंपनीत तोफखाना खात्यात कॅप्टन रसेल या वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्याचा भाऊंच्या काम करण्याच्या पद्धतीवर इतका विश्वास होता की ”डव अफए ट इफडळऌएफ” म्हणत त्यांना त्यांनी कायमचं जवळ केलं. परिणामी कारखान्यातील सर्व कामगार वर्गात भाऊंची वट-पत वधारली. आणि साऱ्या कंपनीत मूळनाव मागे पडून त्यांना भाऊ नावाने ओळखायला लागले. तर कॅप्टन रसेलचा लोभ भाऊंना लाभल्याने त्यांना भाऊ रसूल म्हणूनही ओळख लाभली ती कायमची.
अपार कष्ट उपसणाऱ्या भाऊ अजिंक्य यांच्या गनर्केरिएजमधील नोकरीच्या काळात मुंबईला तसा ग्रामीण बाज होता. माहीम, माटुंगा, वरळी, परळ, माजगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटांत मुंबई विभागलेली होती. गनर्केरिएज कारखान्यात उपरोक्त सात बेटांवरून कामगार येत असल्याने त्यांच्या जेवणा-खाण्याचे हाल होत. कामगारांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी आपण उपाहारगृह सुरू करण्याची इच्छा भाऊंनी कारखाना प्रशासनाकडे बोलून दाखवली. भाऊंवर विश्वास असलेल्या रसेलसाहेबांनी हे उपाहारगृह सुरू करून भाऊ अजिंक्यनीच चालवावे असे सुचवले. उत्साही भाऊंना ही संधीच होती. कर्मचाऱ्यांना माफक दरात दुपारचे भोजन उपलब्ध करून द्यायला भाऊंनी सुरुवात केली. येथूनच भाऊंच्या उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या उद्योगांची सुरुवात झाली.
भाऊंच्या ठायी असलेली कल्पकता आणि परिश्रम घेण्याच्या तयारीमुळे कॅप्टन रसेलसाहेबांनी त्यांना नोकरीतील बढतीबरोबर प्राथमिक अवस्थेतील पण वाढत्या व्यापारी क्षेत्राचं दालन उघड करून दिलं. वाढत्या लोकसंख्येच्या मुंबईतील जमा होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न होताच. भाऊंनी हे काम हाती घेऊन त्याचा मक्ताच सरकारकडून मिळवल्यावर गनर्केरिएज अस्थापनेतील नोकरीला त्यांनी रामराम ठोकला. आता ते खऱ्या अर्थी व्यावसायिक झाले. जोडीला शहरातील डबकी आणि सांडपाण्याच्या खोलगट जागांवर भराव टाकून ते बुजवण्याचं कंत्राटही मिळवण्यात भाऊ यशस्वी झाले. उरण ते मुंबई सागरी प्रवास करताना, मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल व्हायचे. प्रवाशांना किनाऱ्यावर सुखरूप उतरून इच्छितस्थळी मार्गस्थ होण्यासाठी चांगले रस्ते बांधण्यासाठी त्यावेळचे रेव्ह्य़ेन्यू कलेक्टर ब्रुससाहेबांकडे भाऊंनी अर्ज केला. त्याद्वारे मशिद बंदर ते क्रॉफर्डमार्केट, डोंगरी ते समुद्रसपाटीपर्यंत पाण्याखालील जागेवर भराव टाकून रस्ताबांधणी कंत्राट देण्याची विनंती केली. हे काम मिळवण्यात भाऊ अजिंक्य यशस्वी झाले. कारण ‘या नियोजित कामामुळे प्रवाशांची सोय होऊन बंदरमार्गे होणाऱ्या व्यापाराला चालना मिळून सरकारचा महसूलही वाढेल,’ हे सरकारला भाऊंनी पटवून दिले. भाऊंच्या या प्रस्तावाला गव्हर्नर ग्रांटकडे शिफारस करताना कलेक्टर ब्रुसनी अभिप्राय दिलाय की, लक्ष्मण हरिश्चंद्रजींनी प्रस्तावाद्वारे सादर केलेल्या सूचना सार्वजनिक हिताच्या असून सागरीमार्गे होत असलेल्या तस्करीलाही आळा बसेल. स्थानिक लोकांना लिजवर जागा देऊन त्यांचा विकास करण्याच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणानुसार भाऊंनी रस्तेबांधणीत जी प्रगती साधली त्यामुळे भाऊ अजिंक्य यांना बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखीसह मान्यता प्राप्त झाली.
भारतामध्ये प्रशासनाची घडी बसवताना ब्रिटिश राज्यकर्त्यांचं मुंबई परिक्षेत्रातील जमिनीचा हवा तसा विकास होण्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पडीक जमिनीवर कृषी उत्पादन आणि शेतीला पुरक असे पशुसंवर्धनाचे व्यवसाय करण्यासाठी ठरावीक प्रतिष्ठित नागरिकांना ओसाड गावं वहिवाटी पद्धतीनुसार देण्याचा धोरणात्मक निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. या ओसाड जमिनीवर लागवड करून विकास करणाऱ्यांना खोत म्हणत असत. आव्हानं स्वीकारणाऱ्या भाऊंनी वहिवाटीसाठी अर्ज केला. त्याला गॉडफादर कॅप्टन रसेलनी शिफारस केल्यावर मुंबई उपनगरातील दिंडोशी (गोरेगाव), चिंचवली (मालाड), आकुर्ली (कांदिवली) या तीन गावांच्या खोतीचे कायदेशीर हक्क ईस्ट इंडिया कंपनीकडून भाऊंनी मिळवले आणि बांधकाम व्यावसायिक भाऊ ‘खोत’  म्हणूनही ओळखले जाऊ लागले..
नैसर्गिक बंदर म्हणून मुंबईचे नाव सर्वत्र होते हे जरी खरे असले तरी दीडशे वर्षांपूर्वी साऱ्या मुंबई बेटावर समुद्रमार्गे होणारी मालाची व प्रवाशांची वहातूक लहान-मोठे मचवे-गलबत्ताद्वारे होत असे. १८८६ पर्यंत मुंबईच्या अफाट सागरी किनाऱ्यावर प्रवाशांसह मालाची चढ-उतार करण्यासाठी सुरक्षित असा धक्का नव्हता. त्यामुळे दूरवरून सागरी प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल व्हायचे. कारण प्रवासी आगबोटी समुद्रात आत लांबवर उभे करून मचव्यातून किनाऱ्यावर येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींशी सामना करावा लागायचा.
मुंबईमार्गे देशात व्यापारवृद्धी करण्याचा ध्यास घेतलेल्या दूरदृष्टीच्या इंग्रजांना ही मालधक्क्याची उणीव वारंवार जाणवायला लागली. अखेर सुरक्षित मालधक्का बांधण्याचा तत्त्वत: निर्णय घेण्यात आला. पण हे प्रचंड खर्चीक काम स्वत: हाती घेण्याइतपत सरकारची तिजोरी भरलेली नव्हती. परिणामी मालकी हक्कांनी बंदर बांधकाम करण्यासाठी अर्ज मागवले. नेहमीच आव्हानं स्वीकारणाऱ्या भाऊंनी या कामासाठी अर्ज करण्याचं धाडस केलं. तेव्हा भाऊंजवळ पुरेशी गंगाजळी होती असे नव्हे. त्यावेळी अनेक समकालिनांची हे काम हाती घेण्याची ऐपत होती, पण हे काम स्वीकारण्याची हिंमत केली ती भाऊ अजिंक्यनी. भाऊंच्या अर्जाला काही अटींवर मंजुरी देऊन त्यांच्याकडून नियोजित बंदर कामाचा आराखडा मागवला. भाऊंनी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करताना समुद्राच्या भरती-ओहोटीसह एकूण पर्यावरणाचाही अभ्यास केला होता. भरती-ओहोटी-वादळवाऱ्यानी मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव घालून नियोजित बांधकामासाठी जमिनीला आकार दिला. कचरा पाण्याने ओला झाल्यावर त्याचा लगदा जमिनीला पकड घेणार हे अनुभवी भाऊ जाणून होते. कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे पूर्वीपासून होतेच.
मर्यादित साधनसामुग्री, यंत्रसामुग्रीची कमतरता, अपुरा निधी, वेळेचे बंधन, लिज करारातील अनेकदा झालेले फेरबदल यांमुळे भाऊंची कोंडी झाली होती. त्यात आणखीन काही स्थानिकांनीही आपले हित जपण्यासाठी सरकारवर दबाव आणून अडथळे निर्माण केले. भाऊ अजिंक्य यांच्या अडचणी जाणून तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी ६% चक्रवाढ व्याजांनी दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याने कामाला गती आली. कर्जाचं ओझं शिरावर घेऊन भाऊंनी चार वर्षांत बंदराचं काम पूर्ण केलं. इतकेच नव्हे तर या बंदरावर येणाऱ्या-जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखारही उभारली. देशातील मुंबई हे पहिले वखारयुक्त बंदर गणले जाते.
आपण उभारलेलं बंदर साऱ्या देशात परिपूर्ण आणि आदर्श होण्यासाठी भाऊंची करडी अनुभवी नजर बांधकामावर होतीच. बंदराला आवश्यक त्या शेड्स, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था, प्रवासी, माल वहातुकीसाठी अ‍ॅप्रोच रोड, सुरक्षित तटबंदीची बांधणी मोठय़ा कल्पकतेनी केली गेली. या प्रचंड बांधकामामुळे स्थानिकांना रोजगारही मिळाला ही आणखीन एक जमेची बाजू. भाऊंची तत्परता, कौशल्य आणि प्रामाणिकपणाची जाण ठेवून ईस्ट इंडिया कंपनीने जलवाहतुकीद्वारे मालाची चढ-उतार करण्यासाठी पुढील पन्नास वर्षांचा मक्ता भाऊंना बहाल केला. बांधकामाच्या पूर्ततेपासून दीर्घकाळचा मक्ता प्राप्त होण्यापर्यंतच्या प्रवासामुळे हे परिक्षेत्र ‘भाऊचा धक्का’ म्हणून आजतागायत ओळखले जाते आणि हेच नाव समाजमनावर कायमचं कोरलं गेलं. याच सुमाराला गव्हर्नरपदी जेम्स कारनॅक यांची नेमणूक झाली होती. ‘मी बांधलेल्या या बंदर धक्क्य़ाला गव्हर्नर कारनॅक साहेबांचे नाव द्यावे’ ही भाऊंनी केलेली सूचना वजा विनंती म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवतो. आजही हे कारनॅक बंदर म्हणूनही ओळखलं जात असले तरी शेकडो वर्षे ‘भाऊचा धक्का’ हे नामाभिमान समाजमनावर कायमचं आहे.
कामावरील निष्ठा, कठोर परिश्रम, निसर्गदत्त कल्पकता आणि द्रष्टेपणानी एक माणूस प्रतिकूल परिस्थितीतही कायम स्वरूपी काय नवनिर्मिती
करू शकतो याचं अजोड उदाहरण म्हणजे ‘भाऊचा धक्का’.
अरुण मळेकर

‘भाऊचा धक्का’ या प्रचंड कामाच्या निर्मितीवर खूश होऊन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रांट मायदेशी परतताना उत्स्फूर्तपणे म्हणतो, ‘या बांधकामातील प्रगती पाहून मी आश्चर्यचकित झालो. लक्ष्मण अजिंक्य यांची इच्छाशक्ती आणि जनतेचे हित समोर ठेवून केलेल्या या विशाल कामाला उल्लेखनीयच म्हणावे लागेल.
२७ एप्रिल १८४१

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?