माणसाने चित्रलिपीपासून अक्षरलिपीपर्यंत प्रवास केला. हळूहळू माणूस खूप लिहू लागला. पण कमी शब्दात जास्त आशयाची कला काही थोडय़ांना लाभली. चारोळ्या लोकप्रिय झाल्या. मग ट्विटरनं व्यक्त व्हायला शब्दमर्यादा दिली, तिचंही कौतुक वाटलं. आता तर आणखी कमी शब्दात व्यक्त व्हायचा ट्रेण्ड आलाय.
एखादी गोष्ट, भावना पोचवण्यासाठी.. थोडक्यात व्यक्त होण्यासाठी शब्द महत्त्वाची भूमिको पार पाडत असतात. ट्विटरवर व्यक्त होण्यासाठी १४० शब्दांची मर्यादा आहे. कमी शब्दांत सगळा आशय मांडणं हे आव्हान आता बहुतेक नेटकरांनी पेलल्याचं दिसतंय. १४० पेक्षाही कमी शब्दांत व्यक्त व्हायचा ट्रेण्ड सध्या दिसू लागला आहे. वन लायनर्स, शब्दांचे खेळ, चारोळ्या यांचा सध्या ट्ट्विटरच नाही, तर फेसबुकादी इतर समाज माध्यमांवरदेखील पूर आला आहे. फेसबुकवरची काही पानं या अशा शब्दांच्या खेळासाठीच सध्या प्रसिद्ध होत आहेत. ‘द हॅपी पेज’, ‘टेरिबली टायनी टेल्स’, ‘द स्क्रीबल्ड स्टोरीज’, ‘वर्ड पॉर्न’ आदी फेसबुक पेजेवरच्या अ‍ॅक्टिव्हिटीज सध्या वाढल्या आहेत. त्यावरचा मजकूर, चारोळ्या, वाक्य शेअर होतात आणि इन्स्टाग्रामसारख्या दुसऱ्या माध्यमावरदेखील पोस्ट होऊन व्हायरल होताना दिसताहेत.
यात सगळ्यात आघाडीवर आहे. ‘सिक्स वर्ड स्टोरी’ हा ट्रेण्ड. गोष्ट ऐकणं आणि आपली गोष्ट इतरांना सांगणं लहानपणापासून अनेकांच्या आवडीचा छंद. पण एखादी गोष्ट सहा शब्दांतच संपली तर ? होय.. केवळ सहा शब्द आणि त्यात दडलेला अर्थ अगदी व्यक्ती सापेक्ष. आता अशा सहा शब्दांच्या गोष्टी सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करताना दिसतात. फेसबुक, ट्विटर, टम्बलरवर #sixwordstory हा टॅग ट्रेिण्डगमध्ये असल्याचं दिसतंय. कोणत्याही विषयाचं, भाषेचं बंधन नाही अट एकच सहा शब्दांत व्यक्त होणं. कोणतीही गोष्ट जास्त न ताणता केवळ सहा शब्दांत सगळं सार सांगून जाते. या सहा शब्दांच्या गोष्टीला पाश्र्वभूमी आहे प्रसिद्ध अमेरिकन लेखक, कादंबरीकार, पत्रकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या पुण्यतिथीची. हेमिंग्वे यांना त्यांच्या लेखक मित्रांनी केवळ सहा शब्दांत गोष्ट लिहिण्याचं आव्हान दिलं. तेव्हा त्यांनी एका कागदावर For sale: baby shoes, never worn असं लिहिलं. असं म्हणतात की, तेव्हापासून सहा शब्दांत गोष्ट लिहिण्याची सुरुवात झाली असावी. २ जुलै रोजी अर्नेस्ट हेमिंग्वे यांची पुण्यतिथी आहे.
सुरुवातीला केवळ इंग्रजीत या सहा शब्दांतल्या गोष्टी पोस्ट होताना दिसत होत्या. मग हळूहळू मराठी आणि हिंदीत भाषेतून देखील वाचायला मिळाल्या. ‘सिक्स वर्ड स्टोरी’चा ट्रेण्ड नव्यानं येत असला, तरी शब्दांशी खेळ मांडायचा प्रयत्न अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांनी सुरू केलेला आहे. कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याचं आव्हान अनेक नवखे लेखकही स्वीकारत आहेत. फेसबुकवर अशी अनेक मराठी पेजेससुद्धा दिसतात. मराठी लघुत्तम कथा, चारोळ्या आदी पानांवर हे असे नवसाहित्य दिसतं.