टी.व्ही., मोबाइल, संगणक आणि सोशल साइट्सच्या प्रेमात अडकलेल्या मुलांमध्ये साहसाची रुजवात करण्यासाठी युथ हॉस्टेलच्या वतीने आयोजित करण्यात येणारे साहस शिबीर नुकतेच मुरबाड-टोकावडे येथील चासोळे या गावात पार पडले. तीन दिवसांच्या या निसर्ग साहस शिबिरामध्ये १० ते १६ वयोगटातील ९२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. साहसी खेळाचा अनुभव घेताना निसर्गातील नव्या घटकांशी आपुलकी निर्माण करण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले याचे समाधान विद्यार्थी आणि पालक व्यक्त करत आहेत.युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया अंबरनाथ युनिटच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून अंबरनाथ शहरातील विद्यार्थ्यांना साहसी खेळांची आणि निसर्गाची विस्तृत ओळख होण्यासाठी साहस शिबिराचे आयोजन केले जाते. दिवाळीच्या सुट्टीतील मुलांच्या आयुष्यात निसर्गाबद्दलची आपुलकी आणि स्वत:बद्दलचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. निसर्गात राहताना साहस, शिस्तीबरोबरच दोरीच्या साहाय्याने चढणे, िभतीवर चढणे, दोरीच्या साहाय्याने दरी ओलांडणे, पक्षी निरीक्षण, शेकोटी, तंबू उभारणे, पोहणे अशा प्रकारच्या विविध खेळांचा त्यामध्ये सहभाग होता. या मुलांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. मुलांसाठी हे शिबीर म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. प्रशांत खानविलकर, डॉ. जयराज भालेराव, रुपेश कुलकर्णी, अनघा लेले, अपर्णा भट्टे या युथ हॉस्टेलच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.