वाढती वाहनांची संख्या आणि रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणे यामुळे आधीच वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागपूरकरांना हिवाळी अधिवेशनातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाने शहरात होत असललेल्या वाहतूक कोडींचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या मध्यभागातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग आहे. यामुळे पूर्व आणि दक्षिण नागपुरात राहणाऱ्यांना पश्चिम नागपुरात जाण्यासाठी रेल्वे भुयार मार्ग, रेल्वे उड्डाण पुलाशिवाय पर्याय नाही. शहरातील मध्यवर्ती भाग असलेला सीताबर्डी, सदर, रामदासपेठ, धंतोली या इस्पितळे, महत्त्वाची कार्यालय, शॉपिंग मॉल, सिनेमा आणि बाजारपेठा आहेत. यामुळे या भागात लोकांची वर्दळ असते. सिव्हिल लाईन्स भागात शासकीय कार्यालये, उच्च न्यायालय, विधानभवन, मंत्र्यांची निवासस्थाने असल्याने या भागात ये-जा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरातील जवळपास अर्धी लोकसंख्या पूर्व आणि दक्षिण नागपुरात राहात आहे. त्यांना धंतोली, सिव्हिल लाईन्स, सीताबर्डी, रामदासपेठकडे यायचे असल्याने मुंबई-हावडा रेल्वे मार्ग ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही.
लोखंडीपूल आणि मानस चौक या भागात कार्यालयीन वेळात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचे झाले आहे. ज्या दिवशी गणेश टेकडी मार्गावर मोर्चा असेल त्यादिवशी त्या भागात जाणे म्हणजे जीव संकटात टाकण्यासारखे असते. नागपुरात अधिवेशन सुरू असल्याने काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. परंतु बाजारपेठा आणि कार्यालये शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने नागपूरकरांना त्या जाण्याशिवाय पयार्य नाही. परंतु वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन या बाबत मोठी बोंब असल्याने शहरवासीयांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीतून मुंगीच्या गतीने वाहने ढकलावी लागत आहे. काँग्रेस आघाडीच्या सरकारला प्रत्येक मुद्दय़ांवरून धारेवर धरणाऱ्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी वाहतुकीची कोंडी फोडून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करावी, अशी रास्त अपेक्षा नागपूरच्या जनतेची आहे.

वाहतुकीच्या कोंडीचा सामना करणारे मार्ग
* सदरवरील लिबर्टी,स्मृती चित्रपटगृह, नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय आणि एलआयी चौक किग्सवे, विभागीय रेल्वे कार्यालय.
* लोखंडी पूल, जयस्तंभ चौक आणि कॉटन मार्केट चौक.
* महाराज बाग, व्हरायटी चौक आणि मुंजे चौक आणि नवीन भुयारी मार्ग.
* पंचशील चौक, पत्रकारभवन, धंतोली पोलीस ठाणे.
* रामदासपेठेतील गोलबाजार, जनता चौक