बुलढाणा : समाजातील बहुतेक घटकाजवळ पैसा आल्याने आणि आजच्या व्यस्त जीवनशैली मुळे घरात वाहन असणे सामान्य बाब झाली आहे. तसेच वाहन चोरी, वाहन चोरांच्या टोळ्या ही देखील सामान्य बाब ठरली आहे. मात्र या चोरांची वा टोळ्यांची मजल तर कार चोरण्यापर्यंत जाते.
मात्र मोताळा नगरीत अज्ञात बहाद्धर चोरांनी वा टोळीने चक्क अवजड असे ट्रॅक्टरच चोरून नेण्याचा प्रताप केला आहे. मोठे धूड असलेले आणि चालविण्यास अवघड असलेले ट्रॅक्टर चोरीस गेल्याने गावकऱ्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. या अजब चोरीची गजब घटना मोताळा शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात खमंग चर्चा सुरु आहे.

मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मोताळा येथून महिंद्रा कंपनीचे पावणेचार लाखांचे ट्रॅक्टर लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक गुन्ह्यांचा पोलिसांनी उकल करीत चोराट्यांना पकडले देखील आहे. मात्र, चोरट्यांनी एक विक्रम करीत चक्क ट्रॅक्टर चोरण्याची किमया केली. मोताळा नांदुरा मार्गावरील नांदुरा अर्बन बँकेच्या समोरुन महिंद्रा कंपनीचा स्वराज ७४२ ट्रक्टर (एमएच २८-सीसी २००९ क्रमांकाचा) ३ लाख ८० हजार किमतीचा ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केला.

शेख अलीम शेख जलील (राहणार बोराखेडी, तालुका मोताळा ) हे वाहनाचे मालक आहे. त्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार नंदकिशोर धांडे यांच्या समक्ष आता या अवजड वाहनाचा तपास करण्याचे मजेदार आवाहन आहे.