बुलढाणा : बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण अत्यावस्थ झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नजिकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगांव फाट्याजवळील हा दुर्दैवी आणि जीवाचा थरकाप उडविणारा धक्कादायक घटनाक्रम घटना घडला. काल गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. गंभीर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मलकापूर शहरातील तिघा युवकांसाठी काल गुरुवारची रात्र अक्षरशः काळ रात्र ठरली. या भीषण घटनेत साजीदखान जलीलखान (वय २२ वर्षे) आणि मुस्ताकखान जब्बारखान (वय ३८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेत आरिफखान बशिरखान (वय ३८वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही मलकापूर येथील पारपेठ परिसरातील रहिवासी आहेत. पंचवीस सप्टेंबर च्या रात्री साडेनऊ वाजताच्या आसपास हे तिघे कामावर जाण्यासाठी घरून बाहेर पडले होते.

रात्री पावणे अकरा वाजताच्या आसपास पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली. यामुळे तिघा युवकांच्या घरी एकच आकांत उसळला. काल मध्यरात्रीच्या सुमारास गंभीर जखमी आरिफखान याला तातडीने नांदुरा येथील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू आहेत. तो मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, दोन्ही मृतदेहांना प्राथमिक तपासानंतर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

आज शुक्रवार सकाळी या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. यामुळे नांदुरा आणि मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली या घटनेने नांदुरा व मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पारपेठ ( मलकापूर) परिसर हादरला आहे. अपघात कसा घडला याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क व्यक्त होत आहेत. या पम्प धारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांकडून होत आहे. घटनेचा तपास नांदुरा पोलीस करीत आहे.