सर्वेक्षणाच्या अहवालानंतर निश्चित होणार उमेदवार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे, याची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाच इच्छुक उमेदवारांची नावे शहर भाजपकडून प्रदेशला पाठविण्यात आली असली तरी सर्वेक्षणात कोणत्या उमेदवाराला पसंती मिळते, यावरच उमेदवार निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा >>>पुणे :’ती’ सध्या चांगल्या कपड्यामध्ये दिसते,उर्फी जावेदच चित्रा वाघ यांच्याकडून कौतुक

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहर भारतीय जनता पक्षाकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिंरजीव कुणाल यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे या पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. प्रदेशच्या भाजप संसदीय मंडळाकडून यातील तीन नावे निश्चित करून दिल्लीतील निवड समितीकडून उमेदवार निश्चित होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अंतर्गत सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: मार्केट यार्डातील बेकायदा लिंबू विक्रेत्यांवर कारवाईच्या निषेधार्थ ‘दलित पॅंथर’चे आंदोलन

भाजपने शहरा बाहेरील तीन संस्थांकडून उमेदवार कोण असावा यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. पुढील दोन दिवसात त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश हे प्रबळ दावेदार आहेत. शैलेश टिळक यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.