महानंदचा महाघोळ भाग : १
दत्ता जाधव, लोकसत्ता
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (मुंबई) म्हणजेच महानंदचा पांढरा हत्ती झाला आहे. हा हत्ती पोसणे आता महानंदच काय, राज्य सरकारच्याही आवाक्याबाहेर चालले आहे. कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार भागविण्याइतकीही आर्थिक क्षमता महानंदमध्ये राहिलेली नाही.
महानंदची दैनदिन दूध संकलनाची क्षमता सुमारे दहा लाख लिटर आहे. त्यापैकी आजघडीला जेमतेम दीड लाख लिटर दूध संकलन होते. दूध साठविण्याची तीन शीतगृहांची एकूण क्षमता साडेसहा लाख लिटर आहे, मात्र या शीतगृहांत ठेवण्यासाठी दूधही मिळत नाही. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची दैनिक क्षमता २५ हजार लिटर/ किलो आहे. पण, दुधाची कमतरता, दुग्धजन्य पदार्थाच्या वेष्टनासाठी आवश्यक कच्चा माल (बाटल्या, प्लॉस्टिक कागद) नसल्यामुळे रोज जेमतेम पाच ते सहा हजार किलोपर्यंतच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होत आहे. गोरेगाव येथे एक लाख लिटर क्षमतेचा अत्याधुनिक टेट्रा प्रकल्प (उच्च तापमानाला दूध उकळून थंड करणे) तयार आहे. या प्रकल्पासाठीही पुरेसे दूध मिळत नाही. सैन्य दलाला रोज दूधपुरवठा करण्याचा ठेका महानंदला मिळाला होता. पण, महानंद नियमित दूधपुरवठा करू न शकल्यामुळे हा ठेका हातून गेला आहे. टेट्रा प्रकल्पात पतंजलीसारख्या दूध कंपन्यांच्या दुधावर प्रक्रिया केली जायची, तेही बंद झाले आहे. परिणामी भाडय़ापोटी मिळणारे उत्पन्न थांबले आहे. पुणे जिल्ह्यात वरवंड येथे रोज तीन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून पावडर आणि बटर निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद असून, त्याला गंज लागला आहे. नागपूर, पुणे, लातूर आणि कडेपूर (सांगली) येथील दूध संकलन प्रकल्पही क्षमतेच्या जेमतेम १५ टक्के सुरू आहे.
दूध संकलनात मोठी घट
महानंदचे दैनंदिन दूध संकलन १९९५-९६मध्ये दहा ते अकरा लाख लिटर होते. आज गोरेगाव केंद्रातील संकलन ८० हजार लिटरवर आले आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांचे मिळून एकत्रित दूध संकलन ५० हजार लिटरवर आले आहे. आजघडीचे एकूण दूध संकलन दीड लाख लिटरच्या आतच आहे. प्रकल्पांची क्षमता मोठी असूनही ते पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. अनेक प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही महानंद आर्थिक गर्तेत जात आहे.
सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून महानंदला लवकरात लवकर आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सभासद दूध संघ, कामगार, ग्राहक व सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. – राजेश परजणे-पाटील, अध्यक्ष, महानंद.