मेळघाट म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेले दान. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यानी समृद्ध मेळघाटात वाघांची संख्या अमाप, पण ते सहजासहजी दिसत नाही. त्यातूनही जंगलाच्या बाहेर वाघाचे दर्शन होणे दुर्मिळच. मेळघाटप्रमाणेच मेळघाटचा वाघही राजबिंडा. ज्याला तो दिसला तो नशीबवान. अशातच हा राजबिंडा वाघ रस्त्यावर येतो आणि वाहनधारकांना दर्शन देतो, जणूकाही तो शतपावलीला निघाला, असा त्याचा राजेशाही थाट सर्वांना भुरळ घालणारा ठरला आहे.
मेळघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार राजकुमार पटेल यांचे चिरंजीव रोहीत पटेल हे रविवारी रात्री अमरावती येथून धारणीला सहकाऱ्यासमवेत परत जात असताना कोलकासजवळ त्यांना मेळघाटच्या राजबिंड्या वाघाचे दर्शन झाले. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना या राजबिंड्या वाघाने दर्शन दिले आणि त्या प्रत्येकाने त्याला डोळ्यात आणि मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- नागपूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ‘वॉर रुम’ तयार – बावनकुळे
“मेळघाटात सहजासहजी वाघ दिसत नाही आणि कोलकासजवळ तो दिसणे म्हणजे आनंदाचा क्षण आहे”. असे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील म्हणाले.